(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Dombivli MIDC Blast : ब्लास्ट झालेल्या कंपनीच्या बॉयलरला परवानगीच नव्हती, 8 जणांचा जीव घेतलेला अनधिकृत बॉयलर कुणाच्या आशीर्वादाने सुरू?
Dombivli Boiler Blast : डोंबिवलीतील ब्लास्टमध्ये आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. या कंपनीच्या बॉयलरला परवानगीच नसल्याचं समोर आलं आहे.
ठाणे : डोंबिवलीत केमिकल्स कंपनीत झालेला स्फोटानंतर कामगार विभागाचा मोठा खुलासा समोर आला आहे. स्फोट झालेल्या अमुदान केमिकल्स कंपनीत बॉयलररसाठी कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती अशी माहिती आहे. या कंपनीत कोणतीही परवानगी घेतलेला अधिकृत बॉयलर नव्हता. त्यामुळे अनाधिकृत बॉयलर कोणाच्या आशीर्वादाने सुरु होता असा सवाल उपस्थित होत आहे.
गुरूवारी दुपारी डोंबिवली एमआयडीसीतील अमुदान केमिकल कंपनीत मोठा स्फोट होऊन आग लागल्याची घटना घडली. या आगीचा लोळ मोठ्या प्रमाणात दिसून येत होता. तसेच आजूबाजूच्या कंपन्यांमध्येही ही आग पसरली. या स्फोटामध्ये आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण यामध्ये जखमी झालेले आहेत.
डोंबिवलीतील या कंपनीमध्ये झालेला स्फोट हा इतका भयंकर होता की त्याचा आवाज तीन ते चार किमीपर्यंत पोहोचला. तसेच या स्फोटामुळे जवळपास दीड किमी परिसरातील सोसायट्यांच्या खिडक्या फुटल्याचं दिसून आलं. या स्फोटामधील बॉयलरचे तुकडे हे दीड-दोन किमीपर्यंत उडून गेले.
कंपनीला लागलेली आग नियंत्रणात आणण्यात अग्निशमन दलास यश आलं आहे. सुरुवातीला आगीवर नियंत्रण आणण्यासाठी अडथळा येत होता. आगीची तीव्रता भीषण व धुराचे लोळ परिसरात पसरत असल्याने अग्निशमनच्या जवानांना आग विझवताना कसरत करावी लागली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची दखल घेत तत्काळ प्रशासनाला नियंत्रण मिळवण्याच्या सूचना दिल्या. दरम्यान केमिकल कंपनीत झालेल्या स्फोटामध्ये पाच ते सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहे.
3 ते 4 किमीपर्यंत स्फोटाचा आवाज
स्फोटाची तीव्रता भीषण असल्याने डोंबिवलीतील रहिवाशी इमारतीच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या, तर परिसरातील दुकानांच्या काचा फुटून रस्त्यावर पडल्याचं दिसून आलं. या बॉयलरच्या स्फोटाचा आवाज 3 ते चार किलोमीटरपर्यंत ऐकू आला आणि आजूबाजूच्या घरांच्या, हॉटेल्स आणि ऑफिसच्या काचा फुटल्याचे व्हिडिओ व फोटो सोशल मीडियातून समोर आले आहेत.
उपचाराचा खर्च सरकार करणार
मंत्री उदय सामंत यांनी डोंबिवली MIDC येथील दुर्घटनास्थळी भेट देऊन मदतकार्याचा आढावा घेतला. या दुर्घटनेत जखमी झालेल्यांच्या उपचाराचा संपूर्ण खर्च सरकारतर्फे करण्यात येणार आहे. या दुर्घटनेची संपूर्ण चौकशी केली जाईल, अशी माहितीही मंत्री सामंत यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
ही बातमी वाचा: