(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Bhiwandi Crime News : लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये जोडीदारानेच संपवलं महिलेचं आयुष्य; प्रियकर फरार, भिवंडीतील मन हेलावून टाकणारी घटना
Bhiwandi Crime : भिवंडीत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या महिलेचा तिच्या प्रियकराने जीव घेतल्याची घटना घडली आहे. दरम्यान प्रियकर फरार असून त्याचा शोध घेण्यात येत आहे.
भिवंडी : भिवंडीमध्ये (Bhiwandi) सध्या गुन्हेगारीचं (Crime) सत्र वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. भिंवडीमधील लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या एका 35 वर्षीय महिलेची गळ चिरुन हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे भिवंडी परिसरात एकच खळबळ उडाली. ही महिला तिच्या नवऱ्याला सोडून प्रियकरासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. भिवंडीतील कोनगाव येथील गणेशनगर (शाम बाग) मध्ये हा धक्कादायक प्रकार घडला. पण तिचा प्रियकर हा फरार असून त्याचा शोध सध्या पोलिसांकडून घेण्यात येत आहे.
नेमकं काय घडलं?
या महिलेचं नाव हे मधु असून शबीर नावाच्या प्रियकरासोबत ती लिव्ह इनमध्ये राहत होती. हे दोघेही एका अंबरनाथमधील एका कंपनीमध्ये कामाला होते. त्यावेळीच त्या दोघांची ओळख झाली आणि त्यांचे सूत जुळून अनैतिक संबंधांना सुरुवात झाली. तर भिवंडीतील गणेश नगर भागामध्ये त्यांनी एक खोली भाड्याने घेऊन तिथे एकत्र राहण्यास सुरुवात केली. मधु यांचा एक विवाह झाला होता.
तर या दोघांसोबत सुरुवातीचे काही महिने मधु यांची मैत्रीण अनिता त्यांच्यासोबत राहत होती. शुक्रवार 15 (सप्टेंबर) रोजी या दोघांमध्ये काही कारणांमुळे भांडण झाले. त्यातच शबीरचा राग अनावर झाल्याने स्वयंपाकघरामध्ये त्याने मधुची धारदार हत्याराने गळा चिरुन हत्या केली. तसेच त्याने तिच्या हाताच्या दोन्ही नसा देखील कापून टाकल्या. त्यामुळे मधु यांचा जागीच मृत्यू झाला. हत्या केल्यानंतर शबीरने त्यांच्या घराला बाहेरुन कुलुप लावले आणि तो पळून गेला.
तर सोमवार (18 सप्टेंबर) रोजी सायंकाळच्या सुमारास त्यांच्या खोलीतून दुर्गंधी येऊ लागली. त्यामुळे आजूबाजूच्या लोकांनी तात्काळ यासंदर्भात कोनगाव पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पवार आणि गुन्हे पोलीस निरीक्षक दीप बने हे पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दाराचे कुलूप तोडले आणि त्यांना स्वयंपाकघरात मधु यांचा मृतदेह आढळून आला. कोनगाव पोलिसांसह , गुन्हे शाखा पथक, फॉरेन्सिक पथक यांनी तातडीने पंचनामे करण्यास सुरुवात केली. तर शवविच्छेदनासाठी मृतदेह भिवंडीतील उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला होता. पण मृतदेह डी कंपोज असल्यामुळे मृतदेह पुढील तपासणीसाठी मुंबईतील जे.जे रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
पोलिसांकडून तपास सुरु
दरम्यान पोलिसांनी यासंदर्भात तपास सुरु केला आहे. त्यांनी मृतक मधु यांची मैत्रीण अनिता शर्मा हिच्या फिर्यादीवरुन आरोपी शबीर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. तर पोलिसांनी घटनास्थळावरुन एक धारदार शस्र देखील जप्त केले. ज्या खोलीमध्ये या महिलेचा मृतदेह आढळला त्या खोलीमध्ये ही महिला एकटीच राहत असल्याची माहिती शेजाऱ्यांनी दिली. तर कधी कधी तिच्यासोबत आणखी एक महिला किंवा कधी कधी काही पुरुषही राहत असल्याचं शेजाऱ्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे पोलिसांना त्यांच्या तपासामध्ये काय आढळून येतं हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे.
हेही वाचा :
सहा वर्षीय चिमुरडीच्या हत्येने भिवंडी हादरली; मृतदेह प्लास्टिकच्या बादलीत कोंबून आरोपी फरार