Bhayander : भाईंदरच्या शेतकऱ्यांच्या जमिनी हडपल्याप्रकरणी चौकशी होणार, उपमुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश
Devendra Fadanvis : श्यामसुंदर अग्रवाल या बिल्डरने जमिनी हडपल्याचा आरोप भाईंदरच्या शेतकऱ्यांनी केला असून त्याच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
Bhayander Land Scam: भाईंदरमधील शेतकऱ्यांच्या कोट्यवधींच्या जमिनी कवडीमोलाने विकत घेतल्याचा आरोप झाल्यानंतर आता या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. भाईंदर मधील शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा फायदा घेत कोट्यवधीच्या जमिनी कवडीमोलाच्या भावाने विकत घेतल्याचा आरोप राज्याच्या पावसाळी अधिवेशनात आमदार प्रशांत बंब आणि सहकारी आमदारांनी केला होता. त्यातही पैसे पूर्ण न देता पोलीस आणि प्रशासनाच्या मदतीने गुंड बिल्डरांनी फसवणूक केल्याचा आरोप केला होता. यावर गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी एसआयटी नेमून यासंदर्भात तपास करुन कारवाई करण्याचे संकेत दिले होते.
भाईंदरच्या राई मुर्धा गावात राहणारे पाटील कुटुंबातील सदस्य, या कुटुंबात एकूण 12 जण आहेत. यांची भाईंदर पूर्वेकडे महेश्वरी भवन रोड या हाय प्रोफाईल एरियात तीन एकर 22 गुंठे जमीन आहे. 2 जुन 1994 साली पाटील कुटुंबानी जमिनीचे शैलेश शाह आणि नरेश जैन यांना फक्त डेव्लल्पमेंटचे अधिकार दिले होते. शाह आणि जैन यांनी मुरारजीभाई छेडा आणि दिनेश छेडा यांनी ही जमीन परस्पर ऑक्टोंबर 1994 मध्ये विकली होती. त्यानंतर मुरारजी छेडा यांच्या मृत्यूनंतर दिनेश छेडा यांनी 2008 आणि 2010 ला श्यामसुंदर अग्रवाल यांना ती जागा विकली. यात तलाठीने जमीन नावावर करताना पाटील कुटुंबातील कुणालाही बोलावलं नाही. पाटील कुटुंबातील काही मयत झाले होते, काहींना पॅरेलिसेस होता तर काही निरक्षर होते. त्या लोकांच्या सह्या महसूल विभागाने घेतल्याचं फेराफेरच्या संहितेमध्ये आढळून आलं आहे.
शेतकऱ्यांना 1994 साली डेव्हल्पमेंटसाठी 87 लाख डिपॉझिट द्यायच ठरलं होतं. मात्र शेतक-यांना शाह आणि जैन यांनी अवघी 16 लाख एवढीच रक्कम दिली होती आणि परस्पर जमीन विकली होती. सध्या त्या जमिनीची वॅल्यू 200 कोटीच्या घरात आहे. आता श्यामसुंदर अग्रवाल शेतकऱ्यांना आपल्या गुंडाकरवी दमदाटी करत आहेत. भाजपाचे पदाधिकारी शेतकऱ्यांना दमदाटी आणि खोट्या गुन्ह्यात फसवण्याची धमकी देत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. श्यामसुंदर अग्रवालवर 31 गुन्हे असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनात दिली होती. या संपूर्ण घटनेबाबत एसआयटी नेमून शेतकऱ्यांना न्याय देण्याची ही ग्वाही दिली होती.
शेतकऱ्यांनी भाईंदर पोलीस ठाण्यात श्यामसुंदर अग्रवालवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. श्यामसुंदर अग्रवालला कोर्टाने शनिवार-रविवारी हजेरी लावायला सांगितले होते. त्यावेळी शेतकऱ्यांनी त्या दिवसांचा सीसीटीव्ही फुटेज माहिती अधिकारामध्ये मागून घेतला. त्यात श्यामसुंदर एकदाही पोलीस ठाण्यात आला नव्हता. मात्र त्याची सही असल्याची माहिती समोर आली. तसेच तेथील पोलीस हवालदारला श्यामसुंदर अग्रवालचा हस्तक लाच देतानाचा विडिओही समोर आला. पोलीस हवालदार लाच घेत नाही, मात्र पोलिसांनी लाच देणाऱ्यावर गुन्हा का दाखल केला नाही याबाबत आता प्रश्न उपस्थित होत आहे.
या शेतकऱ्याची वडिलोपार्जित जागा सध्या बिल्डरांनी फसवणूक करुन कवडीमोलाने घेतली आहे. येथील एक फ्लॅट कोट्यवधीच्या घरात आहे. मात्र या शेतकऱ्यांच्या घरी खाण्यास काहीही नाही. शेतकऱ्यांनी पालिकेला येथील बांधकामाला सीसी देवू नये, आमची फसवणूक झाली आहे असे सांगूनही बिल्डरला बांधकामाची सीसी मिळाली आहे.
पोलीस मदत करत नाही, महसूल विभागाने मयत इसमाला खाली बोलवून सह्या घेतल्या. त्यामुळे या सर्व सिस्टम धनाड्य बिल्डरसाठी राबत असताना आम्हाला न्याय कसा मिळणार असा प्रश्न शेतकऱ्यांनी विचारला आहे. आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही या जमिनीतच स्वतःचं काहीतरी बरं वाईट करुन घेऊ असा इशाराही त्यांनी दिला.