Bhayandar : चोर समजून एकाला चक्क ठार मारलं, नवघर पोलिसांनी अवघ्या 6 तासात आरोपींना केलं जेरबंद
Bhayandar Crime : या मारहाणीत मृत झालेला व्यक्ती त्या ठिकाणी नेमका कशासाठी आला होता, त्याचा उद्देश काय हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
Bhayandar Crime : चोर असल्याच्या संशयाने एका इसमाला केलेल्या अमानुष मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना भाईंदर येथे घडली आहे. या अनोळखी मयताच्या मारेकऱ्यांना अवघ्या 6 तासात अटक करण्यात नवघर पोलिसांना यश आलं आहे. मयताची ओळख अजून पटलेली नसताना आरोपी मात्र जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलं आहे.
नवघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी पहाटे 1 च्या सुमारास भाईंदर पूर्वच्या बी. पी. रोड येथील भाजी मार्केटच्या सार्वजनिक शौचालयाजवळ एका अनोळखी व्यक्तीचा खून झाल्याची घटना घडली होती. या घटनेची माहिती मिळताच नवघर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली.
सीसीटीव्हीच्या आधारे तपास केला, सहा तासात आरोपी जेरबंद
गुन्ह्याच्या घटनास्थळावरील तसेच घटनास्थळाचे आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आणि तांत्रिक विश्लेषणाचे मदतीने आरोपीचा शोध सुरु केला. अवघ्या 6 तासाच्या आत या खुनाच्या गुन्ह्यात चार आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
मयत इसम हा आरोपी रहात असलेल्या ठिकाणी रात्री 1 च्या सुमारास गेल्यानंतर त्यांच्यात वाद सुरू झाला. वादावादीनंतर त्यांच्यात मारहाण सुरू झाली. या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला होता. मयताची अद्याप ओळख पटलेली नाही. मयत त्या रात्री कोणत्या उद्देशाने त्या ठिकाणी गेला होता हे ही अद्याप स्पष्ट झालेले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, मोबाईल चोरीच्या अनेकदा घटना त्याठिकाणी घडल्या होत्या. त्या रात्रीदेखील मयत इसम हा मोबाईल चोरी करण्याच्या उद्देशाने आल्याचे समजून तेथील आरोपींनी मारहाण केल्याचे समजते. सध्या पोलीस या सर्व घटनेचा तपास करत असून, सीसीटीव्हीच्या आधारे या मारहाणीत आणखी किती लोक सहभागी झाले आहेत याचा शोध घेत आहेत.
वाहनाचा कट लागला म्हणून वाद झाला, रागाच्या भरात धाडधाड गोळ्या झाडल्या
वाहनाचा कट लागल्याच्या शुल्लक कारणावरुन यवतमाळमध्ये धाडधाड गोळ्या झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रफीक खान असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी याप्रकरणी तात्काळ कारवाई करत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. मनिष सागर शेंद्रे असे अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. मनिष याला मदत करणारे दोन आरोपी फरार आहेत, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
ही बातमी वाचा: