(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ambernath : अंबरनाथच्या ग्रामपंचायतीत 'सात महिन्यांचा सरपंच', प्रत्येक सदस्याला संधी मिळावी म्हणून अनोखा पॅटर्न
Ambernath : ग्रामपंचायतीत निवडून आलेल्या सर्व सदस्यांना प्रत्येकी सात महिने सरपंचपद दिलं जातंय. ज्यामुळे सर्वांना या पदावर काम करण्याची, गावचा कारभार हाताळण्याची संधी मिळतेय.
मुंबई : अंबरनाथच्या (Ambernath) ढोके दापिवली ग्रामपंचायतीत (Dhoke Dapivali gram panchayat) सात महिन्यांच्या सरपंचपदाचा अनोखा पॅटर्न राबवला जातोय. सरपंचपदाच्या (Sarpanch) निवडणुकीत ( Election ) होणारा घोडेबाजार टाळता यावा, तसंच प्रत्येक सदस्याला सरपंचपदी काम करण्याची संधी मिळावी, यासाठी हा पॅटर्न राबवला जातोय. सध्या राज्यभरात ढोके दापिवली ग्रामपंचायतीच्या पॅटर्नची चर्चा होतेय.
ग्रामपंचायत सदस्य आणि त्यातही सरपंचपदाला ग्रामीण भागात मोठा मान असतो. त्यामुळेच ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत नेहमीच मोठी चुरस पाहायला मिळते. तर सरपंचपदाची निवडणूक ही मोठी प्रतिष्ठेची बनलेली असते. यात अनेकदा घोडेबाजार, वादविवाद होऊन गावातलं वातावरण दूषित होतं. हे प्रकार टाळण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्यातील ढोके दापिवली आंबेशिव खुर्द ग्रुप ग्रामपंचायतीनं सात महिन्याच्या सरपंचपदाची शक्कल लढवली आहे.
या ग्रामपंचायतीत निवडून आलेल्या सर्व सदस्यांना प्रत्येकी सात महिने सरपंचपद दिलं जातंय. ज्यामुळे सर्वांना या पदावर काम करण्याची, गावचा कारभार हाताळण्याची संधी मिळतेय. मागील 14 महिन्यात या ग्रामपंचायतीत तिसऱ्या सरपंच आणि उपसरपंचाची निवड नुकतीच करण्यात आली. या ग्रामपंचायतीत माधुरी रामदास भोईर, नितीन बाळकृष्ण गायकर, जागृती अमोल भोईर, योगेश भालचंद्र भोईर, पूजा सचिन गायकर, रतन रमेश भोपी, श्रीधर बाळाराम भोपी, नीता बळीराम भोपी आणि सरिता गणेश सवार असे एकूण नऊ सदस्य आहेत. यापैकी जागृती अमोल भोईर आणि योगेश भालचंद्र भोईर हे दोन सदस्य यापूर्वी सात-सात महिने सरपंच होऊन गेले आहेत. तर आता माधुरी रामदास भोईर या सरपंच आणि नितीन बाळकृष्ण गायकर हे उपसरपंच बनले आहेत. पुढील सात महिने त्यांचा कार्यकाळ असेल. त्यानंतर पुन्हा नव्या सदस्यांची निवड केली जाईल.
देशात पंचायत राज कायद्याने ग्रामपंचायतींचं महत्त्व दाखवून दिलं आहे. त्यात देशात सर्वाधिक मतदान देखील ग्रामपंचायत निवडणुकीत होतं, हेदेखील समोर आलं आहे. त्यामुळे निवडणुकीत होणारी चुरस, राजकीय स्पर्धा आणि वादविवाद टाळण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील ढोके दापिवलीचा हा पॅटर्न सगळीकडेच राबवायला हरकत नाही, असं या ग्रामपंचायतीच्या सदस्यांचं मत आहे.
महत्वाच्या बातम्या
विनायक मेटेंच्या अपघातानंतर परिवहन विभाग सतर्क; सर्व आमदारांच्या वाहन चालकांना प्रशिक्षण
Pune Crime News: अंधश्रद्धेचा कहर! मांत्रिकाने पुत्रप्राप्तीसाठी सर्वांसमोर विवाहितेला स्नान करण्यास भाग पाडले; पुण्यातील धक्कादायक घटना