मुंबई: भारतात 'Facebook Fuel for India 2020' या कार्यक्रमाचं आयोजन सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकनं केलं आहे. या कार्यक्रमात मंगळवारी फेसबुकचे मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg) आणि रिलायन्सच्या मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्यात भारतीय अर्थव्यवस्थेची गती वाढवण्यासाठी डिजिटलायझेशन आणि लहान उद्योग कशा प्रकारे भूमिका बजावू शकतात या विषयावर चर्चा झाली.
जगाच्या टॉप 3 अर्थव्यवस्थेत भारताचा समावेश असेल
या कार्यक्रमात मुकेश अंबानी यांनी रिलायन्स उद्योग समुहाचा कारभार करताना आपली प्रमुख धोरणं, आराखडे आणि व्यावसायिक संबंध यांची माहिती दिली. त्यांनी सांगितलं की, "कोरोनाच्या संक्रमण काळातही भारत चांगल्या प्रकारे वाटचाल करत आहे. येत्या काही काळात जगातील टॉप 3 अर्थव्यवस्थेत भारताचा समावेश असेल. हा देश एक प्रमुख डिजिटल समाज होण्याचा मार्गावर आहे आणि याची दोरी युवकांच्या हातात असेल. भारताचा प्रति व्यक्ती उत्पन्न 1800-2000 अमेरिकन डॉलर्सवरुन वाढून 5000 अमेरिकन डॉलर्सवर पोहचेल."
मुकेश अंबानी यांनी मार्क झुकरबर्गशी बोलताना सांगितलं की, "जिओने डिजिटल कनेक्टिव्हिटी आणली आहे. WhatsApp Pay सोबत WhatsApp चॅटचा समावेश आहे, त्यामुळे डिजिटल कनेक्टिव्हिटी वाढण्यास मदत होणार आहे. रिलायन्स आणि जिओ मार्टच्या माध्यमातून प्रत्येक भारतीय जागतिक सुविधांचा लाभ घेऊ शकतो. तंत्रज्ञानाचा वापर केल्याने भारताच्या संपत्तीत वाढ होईल."
डिजिटल इंडिया मोहीमेला श्रेय
रिलायन्स उद्योगसमुहाचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी भारतातील डिजिटल सेवांच्या उपलब्धीचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या डिजिटल इंडियाच्या मोहीमेला दिलं. त्याचबरोबर भारताच्या इतिहासातील सर्वात मोठ्या परकीय गुंतवणुकीबद्दल झुकरबर्गचे आभार मानले.
दोन दिवस असेल कार्यक्रम
मंगळवारी सुरु झालेला Facebook Fuel for India 2020 हा कार्यक्रम दोन दिवस चालेल. फेसबुकच्या चीफ ऑपरेटिंग ऑफिसर शरिल सँडबर्ग, इन्स्टाग्रामचे प्रमुख अॅडम मोसेरी आणि WhatsApp चे प्रमुख विल कॅथकार्ट या कार्यक्रमाला संबोधित करणार आहेत. या कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्राची सुरुवात बुधवारी सकाळी दहा वाजता होणार आहे.
हा आहे कार्यक्रमाचा उद्देश
फेसबुक इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर अजित मोहान यांनी या कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करताना सांगितलं की, "आम्ही भारतात फेसबुकच्या काही गोष्टी शेअर करणार आहोत. ज्यामुळे आम्ही नेमकं काय करणार आहोत हे भारतीय युजर्सना सहज समजेल."
महत्वाच्या बातम्या: