मुंबई : देशातील सर्वात श्रीमंत उद्योजक असलेल्या अंबानी कुटुंबात एका चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. नीता अंबानी आणि मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश अंबानी याला पुत्ररत्न झालं आहे. आकाश अंबानी यांची पत्नी श्लोका मेहता हिने आज सकाळी 11 वाजता एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. आकाश आणि श्लोका यांचं 9 मार्च 2019 रोजी लग्न झालं होतं. नव्या पाहुण्याच्या आगमनामुळे अंबानी कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे.
अंबानी कुटुंबाच्या वतीने एका प्रवक्त्यांनी यासंदर्भात माहिती दिली. ते म्हणाले की, "भगवान श्रीकृष्णाच्या कृपेने नीता अंबानी आणि मुकेश अंबानी आजी-आजोबा झाले आहेत. चिमुकल्या पाहुण्याच्या आगमनामुळे ते खूप आनंदी आहेत. आई आणि मुलगा दोघांचीही प्रकृती उत्तम आहे. चिमुकला पाहुणा कुटुंबासाठी आनंदाची बहर घेऊन आला आहे."
2019 मध्ये आकाश आणि श्लोका यांनी बांधली होती लग्नगाठ
आकाश आणि श्लोका यांचा विवाहसोहळा 9 मार्च 2019 मध्ये पार पडला होता. आकाश आणि श्लोका दोघेही शाळेपासूनच एकमेकांना ओळखत असून दोघांनीही आपलं शालेय शिक्षण धीरूभाई अंबानी इंटरनेशनल स्कूलमधून पूर्ण केलं आगे. श्लोकाने लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्स अॅन्ड पॉलिटिकल सायन्समध्ये लॉ शिकली आहे. तिने लॉमध्ये मास्टर्स डिग्रीही मिळवली आहे. श्लोकाने 2015 मध्ये कनेक्ट फॉर नावाने एक एनजीओदेखील सुरु केली होती. या एनजीओद्वारे गरजूंना शिक्षण, अन्न आणि घर उपलब्ध करुन दिलं जातं. आकाश आणि श्लोका यांच्या शाही विवाहसोहळ्याची चर्चा संपूर्ण जगभरात झाली होती. त्यांचं प्रीवेडिंग सेलिब्रेशन स्वितर्झलँडमध्ये करण्यात आलं होतं. हे सेलिब्रेशन तीन दिवस सुरु होतं.