एक्स्प्लोर
लोकसभा निवडणुका फेसबुक-झुकरबर्गसाठी टॉप प्रायोरिटी
भारतातील आगामी लोकसभा निवडणुका हा फेसबुक आणि फेसबुकचा सीईओ मार्क झुकरबर्गसाठी प्राधान्यक्रमावर असल्याची माहिती फेसबुकच्या पदाधिकारी केटी हरबथ यांनी दिली

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुका या फेसबुक आणि मार्क झुकरबर्गसाठी टॉप प्रायोरिटी असल्याचा दावा फेसबुकच्या ग्लोबल पॉलिटिक्स आणि गव्हरमेंट आऊटरिच विभागाच्या संचालक केटी हरबथ यांनी केला आहे. भारतातील सार्वत्रिक निवडणुकीकडे फेसबुक, भारत सरकार आणि भारतीय मतदार-जनता यांच्यासोबतचे संबंध अधिक व्यापक करण्याची एक नामी संधी म्हणून पाहात आहे. या माध्यमातून व्यवसाय वृद्धिंगत करण्याचाही फेसबुकचा प्रयत्न असेल.
सार्वत्रिक निवडणुकांना जेमतेम चार महिन्यांचा अवधी शिल्लक असताना, फेसबुकमधील महत्त्वाच्या नियुक्त्या, जाहिरातीचं पारदर्शक धोरण यावर फेसबुकने काम सुरु केलं आहे. यासाठी काही महिन्यांपूर्वी झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुका तसंच बांगलादेश, ब्राझिल आणि अमेरिकेतील निवडणुकांच्या अनुभवातून भारतात काय काय धोरणं राबवायची याचा अभ्यास केला जात आहे.
फेसबुकच्या ग्लोबल पॉलिटिक्स संचालक केटी हरबथ यांच्या मते भारतातील सार्वत्रिक निवडणूक ही फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग आणि सीओओ शेरील सँडबर्ग यांच्यासाठीही टॉप प्रायोरिटी आहेत.
फेसबुकवर प्रत्येक यूजरला त्याच्या प्रोफाईलवर किंवा पेजवर माहिती पोस्ट करण्याचं स्वातंत्र्य असतं. फेसबुक नेहमीच या व्यक्तीस्वातंत्र्याचा आदर करत आलंय. मात्र यापूर्वीच्या भारतातील तसंच अन्य देशातील निवडणुकीच्या अनुभवातून असंही लक्षात आलंय की काही यूजर्स चुकीची माहिती पोस्ट करतात. अशी खोटी माहिती अनेकदा हेतूपुरस्सर व्हायरल केली जाते. अशा घातक माहितीचा प्रसार रोखण्यासाठी फेसबुक नेहमीच सहकार्य करत आल्याचा दावाही केटी हरबथ यांनी केला.
यापूर्वीच्या बांगलादेश आणि अमेरिकेतील सिनेट निवडणुकीच्या वेळी प्रशासनाने अशा पेजेसबाबत अधिकृत माहिती पुरवली तेव्हा फेसबुकने ते पेज आणि प्रोफाईल हटवले. फक्त प्रशासनच नाही तर सामाजिक दबाव गट, सामाजिक संस्था-संघटना आणि त्रयस्थ संस्था यांच्याकडून फेसबुक अशा उपद्रवी आणि खोटी माहिती पसरवणाऱ्या पेजेसबाबत माहिती संकलित करत असतं. अशा सर्वांबरोबरच भारतातील सार्वत्रिक निवडणुकीच्या काळातही समन्वय साधला जाणार आहे.
फेसबुकप्रमाणेच फेसबुकच्या मालकीच्या इन्स्टाग्रामच्या बाबतीतही हीच पावलं उचलण्यात येणार आहे. खोट्या आणि चुकीच्या माहितीचा प्रसार रोखण्यासाठी फेसबुक समूह यथाशक्ती प्रयत्न करणार आहे.
भारतात फेसबुक आणि इन्स्टाग्राम निवडणूक आयोगासोबत काम करणार आहे. भारतीय निवडणूक आयोग ही घटनात्मक दर्जा असलेली स्वायत्त संस्था आहे. त्यामुळेच भारतीय निवडणुकीत फेसबुक किंवा इंन्स्टाग्रामचा वापर करुन कुणीही खोट्या माहितीचा प्रचार-प्रसार करणार नााही, याकडे कटाक्षाने लक्ष पुरवलं जाणार आहे.
फेसबुक भारतीय निवडणुकांवर ऑक्टोबर 2017 पासूनच काम करत आहे. तेव्हापासून झालेल्या राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुकातून फेसबुक नव्याने काही ना काही शिकत आलंय, असंही त्यांनी सांगितलं. वेगवेगळे राजकीय पक्ष तसंच उद्योगांकडून येणाऱ्या जाहिरातींबाबतही फेसबुकने व्यापक धोरण ठरवलंय. लोकांना असलेल्या माहिती जाणून घेण्याचा हक्क आणि त्यांची व्यक्तिगत गोपनियता याचाही फेसबुक आदर करणार आहे.
भारतासारख्या बहुभाषिक देशात काम करण्यासाठी फेसबुकने वेगवेगळ्या भाषांचे जाणकार असलेल्या गटांसोबत काम करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे वेगवेगळ्या प्रादेशिक भाषांमधील मजकुराचा नेमका अर्थ आणि त्याचा प्रभाव याचा माग काढणं सहज शक्य होणार आहे.
राजकीय पक्ष किंवा राजकीय पक्षांच्या विचारधारेशी साम्य असलेल्या काही त्रयस्थ संस्था त्यांच्या फेसबुक पेजच्या माध्यमातून मतदारांना प्रभावित करण्याचा प्रयत्न करतात. काही वृत्तसंस्था तसंच प्रसारमाध्यमेही असा छुपा प्रयत्न करतात. त्याचा माग घेणं भारतात तुलनेनं अवघड आहे.
फेसबुक अजून बऱ्याच गोष्टी शिकत आहे. व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असतात. प्रत्येक निवडणूक ही शिकण्याची एक संधी असते. तसंच आम्ही प्रत्येक वेळी नवं ज्ञान आत्मसात करतोय असं केटी हरबथ यांनी सांगितलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
बातम्या
पुणे
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
