मुंबई: 5G मोबाईल सेवेचे वेध सध्या जगभरात अनेकांना लागलेत. पण अमेरिकेत सुरू झालेल्या फाईव्ह जी सेवेने मात्र हवाई वाहतूक क्षेत्राच्या तोंडचं पाणी पळवलंय. फाईव्ह जी सेवेसाठी वापरण्यात येणाऱ्या फ्रिक्वेन्सीमुळे गेल्या दोन दिवसांत अमेरिकेला जाणारी आणि अमेरिकेहून बाहेर पडणारी अनेक उड्डाणं रद्द करावी लागली आहेत. एअर इंडियानं गेल्या दोन दिवसात अमेरिकेकडे जाणारी 20 विमानं रद्द केली आहेत.


या महिन्यातील 19 जानेवारीपासून अमेरिकेनं विमानतळांवर 5G इंटरनेट सुविधा सुरु केली खरी, पण त्यामुळे अनेक देश अमेरिकेत विमानाचं लँडिंग करण्यासाठी कचरत आहेत. अनेक देशातल्या विमानसेवांना यामुळे अडथळा निर्माण होतोय.


5Gमुळे विमानाच्या लँडिंगवेळी कसा परिणाम होऊ शकतो ते पाहूयात...
विमानाचं टेक ऑफ किंवा लँडिंग करताना ऑटो पायलट यंत्रणा कार्यान्वित होते. ऑटो पायलट यंत्रणा रडार अल्टिमीटर्सकडून मिळणाऱ्या डेटावर अवलंबून असते. हे अल्टिमीटर्स आणि 5G सिस्टीमच्या फ्रिक्वेन्सी एकमेकांशी धडकतात. त्यामुळे इंजिन आणि ब्रेकिंग सिस्टममध्ये बिघाड होण्याची शक्यता निर्माण होते आणि विमानाचं धावपट्टीवरुन नियंत्रण सुटू शकतं. लॅन्ड झाल्यानंतर ब्रेकिंग सिस्टिम फेल झाल्यास पायलटचे विमानावरील नियंत्रण सुटू शकतं. हवामानात खराबी असेल किंवा रात्रीच्या वेळी लॅंडिंग करताना याचा धोका अधिक आहे. 


सध्या जगभरात इंटरनेटच्या 4G नंतर 5Gची क्रांती घडून येतेय. पण जर हवाई वाहतुकीसारख्या क्षेत्राला याचा इतका मोठा फटका बसणार असेल तर इतर क्षेत्रांसाठीही 5G डोकेदुखी ठरणार का असा प्रश्न आहे. 


महत्त्वाच्या बातम्या :