Suresh Dhas Meet Santosh Deshmukh Family: धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर सुरेध धस पहिल्यांदाच मस्साजोगात पोहचले; धनंजय देशमुख म्हणाले...
Suresh Dhas Meet Santosh Deshmukh Family: सुरेश धस भेटीसाठी दाखल होताच सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी वाशी पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले.

Suresh Dhas Meet Santosh Deshmukh Family: भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी आज (22 फेब्रुवारी) मस्साजोग गावात जाऊन संतोष देशमुख (Santosh Deshmukh Murder Case) कुटुंबियांची भेट घेतली. संतोष देशमुख हत्या प्रकरणात आकाचे आका म्हणत सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्याविरोधात जोरदार राळ उडवून दिली. मात्र काही दिवसांपूर्वी त्यांनी त्याच धनंजय मुंडेंची दोन वेळा भेट घेतल्याचं उघड झाल्यावर सुरेश धस प्रचंड टीकेचे धनीही झाले. त्यानंतर आज सुरेश धस पहिल्यांदाच देशमुख कुटुंबियांच्या भेटीसाठी मस्साजोग गावात पोहचले.
सुरेश धस भेटीसाठी दाखल होताच धनंजय देशमुख काय म्हणाले?
सुरेश धस भेटीसाठी दाखल होताच सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी वाशी पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. सुरेश धस मस्साजोगमध्ये पोहचल्यानंतर त्यांनी उपस्थित असणाऱ्या गावकऱ्यांसोबत चर्चा केली. आरोपीला मदत करणाऱ्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत, असं सुरेश धस म्हणाले. तसेच आरोपीला केज पोलीस कसे मदत करत होते, याची माहिती धनंजय देशमुखांनी सुरेश धस यांना दिली. पोलिसांनी तपास सीआयडीकडे देऊन मोकळे झाले आणि जवाबदारी झटकली, असा आरोपही धनंजय देशमुख यांनी केला.
वाशी पोलिसांच्या भूमिकेवर धनंजय देशमुख यांच्याकडून संशय-
खालील पातळीहून रिपोर्टिंग चुकीची जाते, असा आरोप धनंजय देशमुखांनी केला. वाशीमधील पोलीस अधिकारी हे आरोपी सोबत पळून जाताना फोनवर बोलले आहेत. केज पोलिसांनी कोणतेही पुरावे दिले नाही नागरिकांनी सीसीटीव्ही पुरावे यंत्रणेला सादर केले. संवेदनशील केसमध्ये त्यांनी लक्ष दिले पाहिजे होते. चर्चेमध्ये वाशी पोलिसांच्या भूमिकेवर धनंजय देशमुख यांच्याकडून संशय व्यक्त करण्यात आला. आरोपींचे फोन कॉल पोलिसांना का गेले?, आरोपी जंगलातून पळाले असं देशमुख कुटुंबाला खोटे सांगण्यात आले, असं धनंजय देशमुख म्हणाले. यावर धाराशिव जिल्ह्यातील वाशी येथे जंगल कुठे आहे?, असा सवाल सुरेश धस यांनी उपस्थित केला.
डॉक्टर संभाजी वायभसे याला सहआरोपी करा- सुरेश धस
पोलीस अधिकारी महाजन आणि पाटील हे सहआरोपीच झाले पाहिजेत अशी भूमिका सुरेश धस यांनी व्यक्त केली. पोलिसांनी ॲट्रॉसिटीचा गुन्हा नोंद करून घेतला नाही. सुरेश धस वादग्रस्त अधिकाऱ्यांच्या बदल्यांची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याची माहिती दिली. तत्कालीन पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन बीड जिल्ह्यात का?,असा सवाल उपस्थित करण्यात आला. तसेच डॉक्टर संभाजी वायभसे याला देखील सहआरोपी करा, अशी मागणी सुरेश धस यांनी केली आहे.
महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांचीही सुरेश धस घेणार भेट-
संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांच्या आणि गावकऱ्यांची भेट घेऊन सुरेश धस परळी शहरातील महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांना देखील भेटणार आहेत. महादेव मुंडे यांचा 14 महिन्यापूर्वी खून झाला होता त्यांच्या कुटुंबीयांना सुद्धा पहिल्यांदाच सुरेश धसे परळीत जाऊन भेटणार आहेत. सुरेश धस हे महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांना पहिल्यांदाच परळीत जाऊन भेटल्यानंतर काय भूमिका म्हणतात हे पाहणं मोठं महत्त्वाचं ठरणार आहे.
























