Santosh Deshmukh Murder Case Sudharshan Ghule: 15 दिवस मंदिरात जेवले अन् झोपले; यू ट्यूबवर पाहताच गांभीर्य समजले; तीन दिवसांपूर्वी त्रिकूट फुटले
Santosh Deshmukh Murder Case Sudharshan Ghule: संतोष देशमुख हत्या प्रकरणात एसआयटीच्या चौकशीत धक्कादायक खुलासे ...मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांनी घटनाक्रम सांगितला.
Santosh Deshmukh Murder Case Sudharshan Ghule: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील (Santosh Deshmukh Murder Case) मुख्य आरोपी सुदर्शन घुले (Sudharshan Ghule), सुधीर सांगळे (Sudhir Sangle) हे घटनेनंतर गुजरातला गेले. तेथे 3 तारखेपर्यंत एका देवस्थानात मुक्काम केला. परंतु पैसे संपल्याने दोघेही पुण्यात आले. एका व्यक्तीला भेटून पैसे घेण्यापूर्वीच स्थानिक गुन्हे शाखेने त्यांना बेड्या ठोकल्या. 26 दिवस पोलिसांना गुंगारा कसा दिला याची उकल पोलिस तपासात झाली आहे. दरम्यान, घटना घडल्यावर कसा केला प्रवास हे ही एसआयटीच्या चौकशीत समोर आले आहे. देशमुख यांची हत्या केल्यानंतर सुदर्शन घुले, संतोष आंधळे आणि सुधीर सांगळे हे तिघेही आरोपी सोबतच होते. रेल्वेने ते गुजरातमध्ये गेले. तेथील एका शिवमंदिरात थांबले. जवळपास 15 दिवस तेथेच राहिले. मंदिरातच जेवण आणि झोपणे अशी त्यांची दिनचर्या आतापर्यंत होती.
धारूर तालुक्यातील वायबसे दाम्पत्याकडून आरोपींचा महत्वाची माहिती मिळाली. सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि नव्याने समावेश झालेल्या सिध्दार्थ सोनवणे या तिन्ही आरोपींना केज न्यायालयातून बाहेर काढताच नेकनूर पोलिस ठाण्यात आणले. येथे एसआयटी प्रमुख बसवराज तेली यांनी या तिन्ही आरोपींची कसून चौकशी केली. यामध्ये नंतर सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवत प्रश्नांची सरबत्ती केली. त्याची उत्तरे देताना तिन्ही आरोपींना घाम फुटल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.
तीन दिवसांपूर्वी त्रिकूट फुटले
सुदर्शन घुलेजवळ असलेले पैसे दोन ते तीन दिवसांपूर्वी संपले. त्यामुळे यातील कृष्णा आंधळे हा पैसे नेण्यासाठी परत महाराष्ट्रात आला होता. एका व्यक्तीकडून पैसे घेऊन तो परत जाणार होता; परंतु त्याची वाट न बघताच घुले आणि सांगळे दोघेही पुण्याला आले, एका व्यक्तीला भेटणार होते; परंतु त्याआधीच पोलिसांनी सापळा रचून दोघांनाही ताब्यात घेतले. त्यामुळे कृष्णा आंधळे फरार होणार यशस्वी झाला.
यू ट्यूबवर पाहिली बातमी-
सुदर्शन घुलेसह तिघे जण एका रेल्वेस्थानकावर होते. एका व्यक्तीचा मोबाइल घेतला. त्यात देशमुख हत्या प्रकरणाची बातमी यू ट्यूबवर पाहिली होती. तेथूनच त्यांना प्रकरणाचे गांभीर्य लक्षात आले. त्यामुळे ते महाराष्ट्रात थांबले नाहीत.
आरोपींना 14 दिवसांची सीआयडी कोठडी-
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि सिद्धार्थ सोनवणे या तीनही आरोपींना 14 दिवसांची सीआयडी कोठडी देण्यात आली आहे. केज न्यायालयाचे प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी एस व्ही पावसकर यांनी ही शिक्षा सुनावली आहे. या तीनही आरोपींना 25 दिवसांनंतर अटक करण्यात आली आहे. फरार असलेला मुख्य आरोपी सुदर्शन घुलेसह सुधीर सांगळेच्या मुसक्या एसआयटीच्या पथकाने बालेवाडीत आवळल्या. अद्याप या प्रकरणातील आणखी एक आरोपी कृष्णा आंधळे मात्र फरार आहे.