राज्यभरातील एस. टी. कर्मचारी पुन्हा जाणार संपावर; ऐन सणासुदीच्या दिवसात प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता, नेमकं कारण काय?
Buldhana : येत्या 3 सप्टेंबरपासून एसटी कर्मचारी मोठं आंदोलन छेडण्याच्या तयारीत आहेत. एस. टी. कर्मचारी कृती समितीने सरकारला इशारा दिला असून ऐन सणासुदीच्या दिवसात प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे.
Buldhana News बुलढाणा : राज्यभरातील एस. टी. कर्मचारी पुन्हा एकदा संपावर (ST Workers Strike) जाणार असल्याची माहिती पुढे आली आहे. राज्यातील एसटी कर्मचारी संघटनेच्या कृती समितीची आज बुलढाणा (Buldhana News) येथे बैठक झाली. या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांना राज्य शासकीय कर्मचाऱ्यानुसार वेतन देण्यात यावं, या मागणीसाठी येत्या 3 सप्टेंबरपासून राज्यभरात एसटी कर्मचारी मोठ आंदोलन करणार असल्याचा इशारा आज देण्यात आला आहे. 3 सप्टेंबरनंतर गणेशोत्सव सुरू होतो . मात्र या काळातही एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारले तर प्रवाशांचा मोठे हाल होऊ शकतात. त्यामुळे राज्य सरकारने आमच्या मागण्या लवकर मान्य कराव्या, असा इशाराही कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
...अन्यथा 3 सप्टेंबरपासून मोठं आंदोलन छेडणार
या अंदोलना विषयी बोलताना कृती समितीच्या पदाधिकारी म्हणाले की, महाराष्ट्राची जीवनवाहिनी लालपरी हा महाराष्ट्राचा अविभाज्य घटक आहे. वाहतुकीच्या बाबतीत महाराष्ट्र परिवहन मंडळ हे आशिया खंडात एक नंबरला आहे. या स्थितीत राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे पगारवाढ मिळावी, यासाठी विविध संघटनांच्या माध्यमातून ही कृती समिती तयार झालीय आणि 2016 पासून आमची मागणी राज्यकर्त्यांपर्यंत आम्ही वेळोवेळी आंदोलन करून पोहोचवण्याचा प्रयत्न केला. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन देण्याचा आम्हाला आश्वासन दिले.
परंतु, ती मागणी अद्यापही पूर्ण झालेली नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अतिसंवेदनशील मुख्यमंत्री म्हणून ओळखले जातात. महाराष्ट्रातील जनतेला न्याय देत असताना त्यांनी कर्मचाऱ्यांना देखील न्याय द्यावा. वेतन आयोगाच्या धर्तीवर करार करून राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे पगार वाढ द्यावी, अन्यथा कृती समितीच्या माध्यमातून 3 सप्टेंबरपासून एसटी कर्मचारी मोठे आंदोलन छेडतील, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
कृती समितीच्या माध्यमातून आक्रोश
तसेच, मागील काळात महामंडळ आर्थिक संकटात होते. आता आर्थिक संकटातून बाहेर पडलेले असताना गेल्या अनेक वर्षांपासून कामगारांचा करार प्रलंबित आहे. त्या अनुषंगाने विविध पातळीवर मागण्या करण्यात आल्या. परंतु, मागण्यांचा मार्ग मोकळा होत नव्हता. म्हणून कामगार संघटनेच्या पुढाकारातून महाराष्ट्रातील श्रमिक संघटनांची एक कृती समिती तयार झाली आहे. त्या कृती समितीच्या माध्यमातून वेगवेगळ्या पातळीवर आंदोलन झाले.
याची दखल घेऊन मागील सात तारखेला कॅबिनेट मंत्रीमंडळ बैठक पार पडली. त्यात धोरणात्मक बाबीवर चर्चा झाली. तसेच पुढच्या कॅबिनेटमध्ये कामगारांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र अजून कुठलीही कृती समितीच्या माध्यमातून आज राज्यभरात आक्रोश आंदोलन पार पडत आहे.
आणखी वाचा