Solapur News: उजनी धरण 50 टक्क्यांची पातळी ओलांडणार; परतीच्या पावसामुळं पुणे, सोलापुरातील साखर उद्योगाला जीवदान
Solapur News: आज सकाळी उजनी धरणात (Ujani Dam) 40 हजार क्युसेक विसर्गानं पाणी येत आहे. यामुळे उद्या धरण 50 टक्क्यांची पातळी ओलांडणार आहे. उजनीतील पाण्यामुळे आता पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली असून शेतीलाही रब्बीसाठी एक पाणी पाळी देणं शक्य होणार आहे.
Maharashtra Solapur News: संपूर्ण पावसाळा (Rain Updates) हंगामात साखर पट्ट्याकडे पाठ फिरविलेल्या वरुणराजानं (Monsoon Updates) परतीच्या प्रवासात जोरदार बरसात केल्यानं साखर उद्योगाला (Sugar Industry) दिलासा मिळाला आहे. आता ऊसाच्या थांबलेल्या लागणी तर सुरु होतीलच, शिवाय उभ्या ऊसालाही जीवदान मिळणार आहे. सध्या उजनी धरणात (Ujani Dam) आज सकाळी 42 टक्के पाणीसाठा असून उद्यापर्यंत धरण 50 टक्क्यांची पातळी ओलांडणार आहे. यामुळे बळीराजा सध्या खुशीत असून शेतातील उभ्या पिकाला या पाण्यानं नवसंजीवनी मिळाली आहे.
आज सकाळी उजनी धरणात 40 हजार क्युसेक विसर्गानं पाणी येत आहे. यामुळे उद्या धरण 50 टक्क्यांची पातळी ओलांडणार आहे. उजनीतील पाण्यामुळे आता पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली असून शेतीलाही रब्बीसाठी एक पाणी पाळी देणं शक्य होणार आहे. यामुळे सोलापूर जिल्ह्यातील 44 साखर कारखान्यांना थोडा दिलासा मिळाला आहे. तर, अजून काही दिवस परतीच्या पावसानं साथ दिल्यास उजनी धरण 100 टक्के भरणेदेखील शक्य होणार आहे.
आठ दिवसांपूर्वी सोलापूर जिल्ह्यात तातडीनं दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी विविध पक्ष आणि संघटना आक्रमक झाल्या होत्या. जनावरांचा चारा आणि नागरिकांच्या पिण्यासाठी टँकरची मागणी गावोगावी सुरु झाली होती. सोलापूर, पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा अशा शहरांसाठी उजनी धरणातून 5 टीएमसी पाणी सोडण्याची वेळ आली होती. जागेवर ऊस जळू लागल्यानं शेतकरी चाऱ्यासाठी उसाची विक्री करू लागले होते. यामुळे यंदा कारखाने कसे सुरु करायचे? या चिंतेत जिल्ह्यातील साखर उद्योग असताना वरुणराजानं जोरदार बरसात सुरू केल्यामुळे उजनी धरणात गेल्या चार दिवसांत तब्बल साडेसहा टीएमसी पाणी जमा झालं आहे. उजनीच्या वरील बाजूस असणारे भीमा सब कॉम्प्लेक्समधील कळमोडी, चासकमान, भामा आसखेड, वडिवळे, मुळशी, पवना आंध्रा, कासारसाई ही धरणं भरली आहेत. तर उजनीत येणाऱ्या कुकडी कॉम्प्लेक्समधील पिंपळगाव जोगे, माणिकडोह, येडगाव वडज डिंभे या धरणातील पाणी कुकडी धरणातून घोड नदीत सोडलं जात आहे. हे पाणी दौंडजवळ भीमेला मिळून थेट उजनी धरणाकडे येत आहेत. पुण्याजवळील खडकवासला, वरसगाव, टेमघर आणि पानशेतमधील पाणीही उजनीकडे येऊ लागल्यानं उद्या उजनी धरण 50 टक्के पाणीपातळी ओलांडणार आहे. सध्या उजनी धरणाच्या जिवंत साठ्यात 23 टीएमसी एवढं पाणी जमा झालं असून धरण 100 टक्के भरण्यासाठी अजून 30 टीएमसी पाण्याची गरज आहे. पुढचे दोन दिवस देखील मुसळधार पावसाचा अंदाज असल्यानं भीमा खोरं, कुकडी कॉम्प्लेक्स आणि खडकवासला कॉम्प्लेक्समधील धरणातून येणाऱ्या पाण्यामुळे उजनीची टक्केवारी वधारणार आहे.