अयोध्येत 'होम हवन'साठी तानाजी सावंतांकडून 5 हजार लीटर गीर गाईचे तूप भेट
Ram Mandir Ayodhya : अयोध्यात 500 वर्षानंतर प्रभुरामचंद्र भव्य अशा मंदिरात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातून अनेक प्रकारच्या भेटी अर्पण केल्या जाणार आहेत.
Ram Mandir Ayodhya : अयोध्यात 500 वर्षानंतर प्रभुरामचंद्र भव्य अशा मंदिरात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातून अनेक प्रकारच्या भेटी अर्पण केल्या जाणार आहेत. राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्याकडून 22 जानेवारी रोजी होणाऱ्या पवित्र होम हवनासाठी पाच हजार लीटर गीर गाईचे तूप पाठविण्यात येणार आहे. याबाबतची माहिती आरोग्यमंत्री डॉ तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी दिली.
महाराष्ट्रात एवढ्या प्रमाणात गीर गायीचे तूप मिळत नसल्याने थेट राजस्थान येथून हे तूप मागवून त्यांनी अयोध्येला पाठवून दिले असल्याचे डॉ सावंत यांनी सांगितले. मला जेंव्हा दिल्ली आणि मुंबई येथून तूपासंदर्भात फोन आला त्यावेळी हे माझे परमभाग्य समजून मी तातडीने त्यास होकार दिला. आपल्या भैरवनाथ शुगर इंडस्ट्रीजच्या माध्यमातून हे ५ हजार लीटर तूप पाठवून दिल्याचे त्यांनी सांगितले.
वारकरी संप्रदायाकडून श्रीरामास 'पसायदानाची भेट
श्रीविठ्ठलाची व वारकरी संप्रदायाची भेट म्हणून मर्यादापूरुषोत्तम श्रीरामरायास श्रीसंत ज्ञानेश्वर महाराजांचे अखिल विश्वाच्या हितासाठी मागणी केलेले 'पसायदान ' घेऊन आज वारकरी संत निघणार आहेत. ज्या विश्व माऊली ज्ञानोबारायांनी जे खळांची व्यंकटी सांडो। तया सत्कर्मी रती वाढो। भुता परस्परे जडो। मैत्र जीवांचे।। अशी उदात्त प्रार्थना आपल्या विश्वात्मक श्रीगुरुंकडे केली. जी आजपर्यंत कोणत्याही तत्वज्ञानात ठळकपणे दिसून येत नाही. तेव्हा या जगभरातील लोकांना आचार -विचारांचा विश्वशांतीचा संदेश या निमित्ताने गेला पाहिजे या निर्मळ हेतूने वारकरी संप्रदाय पाईक संघाचे संस्थापक देवव्रत (राणा) महाराज वासकर, राष्ट्रीय अध्यक्ष विठ्ठल महाराज चवरे, कार्याध्यक्ष चैतन्य महाराज देहूकर व प्रदेशाध्यक्ष रामकृष्ण हनुमंत महाराज वीर यांच्या संकल्पनेतून हे पसायदान मूळ मराठी ओवीरुपासह हिंदी,इंग्रजी, व संस्कृत या भाषेत ह.भ.प. यशोधन महाराज साखरे यांच्याकडून व जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ परमसंगणक निर्माते डॉ.विजय भटकर यांच्या मार्गदर्शनाखाली भाषांतरित करुन घेतले आहे. हे पसायदान चांदीच्या पत्र्यावर कोरुन देण्याची संकल्पना आहे, मात्र अल्पकालावधी उपलब्ध असल्यामुळे सध्या हे पसायदान ऑफसेट प्रिंटीग करुन त्यास आकर्षक सोनेरी रंगाची चौकट बसूवन तयार करण्यात आले आहे.
आज अयोध्येस प्रयाण करण्यापूर्वी सर्व महाराज मंडळीनी विठ्ठल मंदिरात येऊन हे 'पसायदान' श्री विठ्ठल रुक्मिणी व श्रीसंत चोखोबाराय, श्रीसंत नामदेव महाराज, दास मारुती यांच्या चरणास लावून आशीर्वाद घेतले. यावेळी सर्वश्री ह.भ.प.चैतन्य महाराज देहूकर , मुरारी महाराज नामदास, रघुनाथ कबीर महाराज, भाऊसाहेब गोसावी महाराज, भरत अलिबागकर महाराज, ज्ञानेश्वर तारे महाराज , रामकृष्ण वीर महाराज, केदार महाराज नामदास इ. उपस्थित होते. शनिवारी म्हणजे 20 जानेवारी रोजी अयोध्येस पोहचत राममंदिर ट्रस्ट कडे वारकरी संप्रदायातील प्रमुख महाराज मंडळींच्या उपस्थितीत हे पसायदान तसेच पवित्र तुळशीची माळ , तुळशीमध्येच बनवलेले सीता-राम विशेष मंगळसुत्र भेट दिले जाणार आहे.