(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Solapur: सोलापूर जिल्हा परिषदेतील निलंबित शिक्षणाधिकारी किरण लोहार पुन्हा चर्चेत, जिल्हा परिषदेत गोंधळ घालत महिलेचा लोहारांवर गंभीर आरोप
Solapur: बोगस शिक्षणाधिकारी म्हणून वावरल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या एका महिलेने जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामध्ये येऊन गोंधळ घातला. यावेळी महिलेने शिक्षण विभागातील अधिकाऱ्यावर गंभीर आरोप केले आहेत.
सोलापूर: सोलापूर जिल्हा परिषदेतील निलंबित शिक्षणाधिकारी किरण लोहार पुन्हा चर्चेत आले आहेत. एका महिलेने लोहार यांच्यावर गंभीर आरोप करत जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागामध्ये गोंधळ घातला आहे. जवळपास 400 जणांकडून गोळा गेलेले 20 ते 22 लाख रुपये लोहार यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्याकडे दिल्याचा दावा महिलेने केला आहे. महिलेच्या आरोपांमुळे लोहार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. लोहार यांनी बनावट ओळखपत्र देत शिक्षण विभागातील भरतीसाठी पैसे उकळण्यास सांगितल्याचा आरोप केला आहे.
बोगस शिक्षणाधिकारी म्हणून वावरल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या एका महिलेने जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामध्ये येऊन गोंधळ घातला. यावेळी या महिलेने शिक्षण विभागातील अधिकाऱ्यावर गंभीर आरोप देखील केले आहेत. जाकिरा शेख असे हा गोंधळ घालणाऱ्या महिलेचे नाव आहे. सहाय्यक शिक्षणाधिकारी असल्याचे सांगत जाकिरा शेख या दक्षिण सोलापुरात वावरत होत्या. पोलिसांना शंका आल्याने या महिलेची चौकशी करण्यात आली. पण संबंधित महिला शिक्षण विभागात काम करतं असल्याबाबत कोणीतही माहिती न मिळाल्याने पोलिसांनी 22 डिसेंबर रोजी जाकिरा शेख या महिलेवर गुन्हा देखील दाखल केला. तसेच तिच्याजवळ असलेले बनावट ओळखपत्र देखील जप्त केले.
दरम्यान या महिलेने बुधवारी सोलापूर जिल्हा परिषदेच्या कार्यालयात येऊन मोठा गोंधळ घातला. तत्कालीन शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी मला शिक्षण खात्याचे ओळखपत्र बनवून दिले. शिक्षण खात्यात भरपूर नोकऱ्या आहेत, उमेदवार आणा, असे सांगून त्यांनी पैसे घेण्यास सांगितले. जवळपास 400 जणांचे 20 ते 22 लाख रुपये मी तत्कालीन शिक्षण अधिकारी किरण लोहार यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्याला दिल्याचा आरोप देखील या महिलेने केला. प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय जावीर यांच्याशी हुज्जत घालत महिलेने गोंधळ घातला.
जाकीरा फिरदोस या महिलेने केलेल्या आरोपानंतर सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने देखील आपली बाजू स्पष्ट केली. ही महिला कोण आहे हिला आपण ओळखत नाही, शिक्षण विभागातील ज्या लोकांबद्दल तिची तक्रार आहे त्याबद्दल तिने लेखी पोलिसात तक्रार द्यावी. पोलीस यासंदर्भात सविस्तर चौकशी करतील, अशी प्रतिक्रिया सोलापूर जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी संजय जावीर यांनी दिली
किरण लोहार यांची वादग्रस्त कारकिर्द
सोलापूर जिल्हा परिषदेचे लाचखोर शिक्षण अधिकारी किरण लोहार निलंबन करण्यात आले आहे. 25 हजारांची लाच घेताना 31 ऑक्टोबर रोजी किरण लोहार यांना रंगेहाथ पकडण्यात आलं होतं. कोल्हापूर जिल्हा परिषदेत त्यांची शैली अत्यंत वादग्रस्त ठरली होती. जिल्हा परिषदेच्या सभागृहातच किरण लोहार यांच्यावर पैसे घेतल्याचे आरोप सदस्यांनी केला होता. त्यामुळे लोहार यांना कार्यमुक्त करण्याचा ठरावही कोल्हापूर जिल्हा परिषदेने केला. सप्टेंबर 2018 मध्ये शिक्षण आयुक्त कार्यालयाने त्यांच्यावर कारवाई करताना माध्यमिक शिक्षणाधिकारी व शिक्षण उपसंचालक या दोन्हीपदावरुन कार्यमुक्त केले. नंतर लोहार यांनी या कारवाई विरोधात कायदेशीर लढा देत कारवाईला स्थगिती मिळवली होती.