Solapur Rains : हरणा नदीत वाहून गेलेल्या व्यक्तीचा मृतदेह दोन दिवसांनी सापडला, गावकरी आक्रमक
Solapur Rains : शौकत नदाफ हे दोन दिवसांपूर्वी कामावरुन घरी परतत असताना नदीच्या पाण्यात पडले. पोहता येत असताना देखील पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने ते वाहून गेले. जर नदीवर पूल असते तर ही घटना घडलीच नसती.
Solapur Rains : सोलापुरातल्या (Solapur) मुस्ती गावात नदीच्या पाण्यात वाहून गेलेल्या व्यक्तीचा मृतदेह आज सापडला आहे. शौकत नदाफ असे या मृत व्यक्तीचे नाव आहे. शौकत नदाफ हे दोन दिवसांपूर्वी नदीच्या (River) पाण्यात वाहून गेले होते. दोन दिवसापासून त्यांचा शोध सुरु होता. मात्र आज त्यांचा मृतदेह एक किलोमीटर अंतरावर सापडला. शौकत यांच्या मृत्यूनंतर गावकरी आक्रमक झाले असून मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुस्ती गावातून हरणा नदी वाहते. मागील काही दिवस झालेल्या पावसामुळे नदीच्या पाण्याला प्रवाह जास्त आहे. नदीच्या पलीकडे मोठी लोकवस्ती आहे. अशात नदीवर पूल देखील नाही. मागील कित्येक वर्षांपासून ग्रामस्थांना अशा परिस्थितीतच जीवघेणा प्रवास करावा लागतो. मागील काही वर्षात नदीच्या पाण्यात पडून ग्रामस्थांचे जीव गेले आहेत. मात्र प्रशासनाकडून याची कोणतेही दखल घेतली जात नाही.
शौकत नदाफ हे दोन दिवसांपूर्वी कामावरुन घरी परतत असताना नदीच्या पाण्यात पडले. पोहता येत असताना देखील पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने ते वाहून गेले. जर नदीवर पूल असते तर ही घटना घडलीच नसती. त्यामुळे हरणा नदीवर तात्काळ पूल बांधण्याची प्रक्रिया सुरु व्हावी, या मृत्युला जो कोणी कारणीभूत असेल त्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, मृताच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका ग्रामस्थ आणि मृताच्या नातेवाईकांनी घेतली आहे.
सोलापुरात सरासरीच्या 125 टक्के जास्त पाऊस
दरम्यान मागील काही दिवसापासून पावसाने उसंत घेतली आहे. आतापर्यंत 202 मिमी पाऊस झाला आहे. सरासरी 160 मिमी इतकी असताना सरासरीपेक्षा 125 टक्के पाऊस जास्त झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. तर दुसरीकडे ज्या शेतकऱ्यांच्या पेरण्या अद्याप झालेल्या नाहीत त्यांची मात्र अडचण होत आहे. शहरात अनेक ठिकाणी खड्डे असल्याने पावसामुळे बहुतांश ठिकाणी पाणी साचलं होतं. त्यामुळे सर्वसामान्य जीव मुठीत घेऊन प्रवास करत होते. सोलापूर जिल्ह्यासाठी पाण्याचा मुख्य साठा असलेले उजनी धरण प्लसमध्ये आल्याने व्यावसायिक आणि सर्वसामान्यांना देखील मोठा दिलासा मिळाला आहे.