Solapur Heavy Rain: सोलापूरमध्ये धडकी भरवणारा पाऊस, सीना नदीच्या पाण्यात 2 लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, नागरिकांना सतर्कतेचा इशारा
Solapur Heavy Rain: सोलापूर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे सोलापूरमधील शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

Solapur Heavy Rain: गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यात पडत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे आणि सर्वसामान्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. दुष्काळाचे चटके सहन करणारा मराठवाडा (Marathwada Rain) सध्या ओल्या दुष्काळानं ओलाचिंब झाला आहे. इतका इतका पाऊस झाला की मराठवाड्याच्या नाकातोंडात पाणी गेले आहे आणि जनजीवन ठप्प झाले आहे. दसऱ्याला कापणीला आलेल्या पिकांचा डोळ्यांसमोर चिखल झाला आणि जागेपणी पाहिलेली स्वप्न वाहून गेली. ज्या काळ्या आईनं आजवर भूक भागवली ती मातीही या पावसानं खरडून गेलीय. सोलापूर, धाराशीव, बीड, जालन्यात पावसाचं थैमान पाहायला मिळालंय. ज्या मराठवाड्याला दुष्काळात रेल्वेनं पाणी पोहोचवावं लागलं होतं. तिकडे आता हेलिकॉप्टरमधून लोकांचं रेस्क्यू करण्याची वेळ आली आहे. खरीपाचा हंगाम आधी दुबार पेरण्यांनी वाया गेला आणि आता आस्मानी संकटानं डोळ्यांना धारा लागल्या आहेत. कोट्यवधी रुपये खर्च करून बहिणींना लाडकी करायचा घाट घालणाऱ्या सरकारला बळीराजाची ही व्यथा दिसेल? बळीराजा लाडका व्हावा यासाठी कोणती व्यवस्था आपलं सरकार उभं करू शकणार आहे? 'मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा' असं म्हणत इथला प्रत्येक जण चिवटपणे जगतो आहे. पण सरकारला आता केवळ पाठीवर हात ठेवून लढ म्हणता येणार नाही आणि ओला दुष्काळ जाहीर करून सढळ मदत देण्याचं कर्तव्य सरकारला नाकारता येणार नाही.
Solapur Barshi Rain: बार्शीतील काटेगाव - चारे रस्त्यावरील चांदणी नदीवरील पूल वाहून गेला
काल रात्री बार्शीतल्या आगळगाव परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे चांदणी नदीला महापूर आला असून काटेगाव ते चारे रस्त्यावरील पूल वाहून गेला आहे. या घटनेमुळे मसोबाचीवाडी, बांगरवाडी, चारे, पाथरी या सह पूर्व भागातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. दररोज शेकडो शेतकरी या पुलावरून आपल्या शेतात ये-जा करीत होते. पूल वाहून गेल्याने शेतकऱ्यांना शेतातील कामकाजासाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तसेच शाळकरी मुले, रुग्ण व नागरिकांच्या दैनंदिन हालचाली ठप्प झाल्या आहेत. स्थानिक ग्रामस्थांनी प्रशासनाला तातडीने पर्यायी व्यवस्था करून देण्याची मागणी केली आहे.
Solapur Sina River: सोलापूरमध्ये सीना नदीला पूर, गावांना पुराच्या पाण्याचा वेढा
सोलापुरातील सीना नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सीना नदीच्या पात्रात 2 लाख क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गांवरील लांबोटी जवळील पूल पाण्याखाली जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. सीना -कोळेगाव, खासापुरी आणि चांदनी प्रकल्पातून सीना नदीमध्ये सुमारे 2 लाख क्यूसेक पाणी सोडले जात असल्याने नदी पात्रातील माढा, मोहोळ आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील गावात पाणी शिरले आहे.
सीना नदीच्या प्रवण क्षेत्रामध्ये रात्रभर मुसळधार पाऊस झाल्याने सीना नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली असून सीना नदीवरील बापले, अनगर, मालिकपेठ, आष्टे हे सर्व बंधारे पाण्याखाली गेले आहेत. सीना नदीत सुरु असलेल्या प्रवाहामुळे आज सोलापुरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. सीना नदीच्या काठावरील गावांना आज सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सीना नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून असून अनेक गावात नदीचे पाणी शिरले असून उत्तर सोलापूर तालुक्यातील तिऱ्हे गावातील पूल काही वेळात पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे.
Solapur Madha Rain: माढा तालुक्यातील गावांना पुराच्या पाण्याचा वेढा
माढा तालुक्यातील सीना नदीकाठच्या गावांमध्ये पाण्याचा वेढा पडला आहे. उंदरगाव, खैराव ,वाकाव यासह अनेक गावांना पाण्याचा वेढा पडल्याने रात्रभर नागरिकांचे स्थलांतर सुरू आहे. तर मोहोळ तालुक्यातील भोयरे गावात कोल्हापूर पद्धतीचा बंधारा पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद झाली आहे.
Solapur Farmers: सोलापूर - बार्शी तालुक्यात पावसाचा कहर; खरीप पिक गेली पाण्याखाली
बार्शी तालुक्यातील ढाळे, पिंपळगाव आणि हिंगणी मध्यम प्रकल्प परिसरात ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्यामुळे भोगावती आणि नीलकंठा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे ढाळे पिंपळगाव,पिंपरी साकत,हिंगणी,झाडी,बोरगाव परिसराचा संपर्क तुटला आहे. काढणीला आलेले सोयाबीन गुडगाभर पाण्यामध्ये गेल्याने मातीमोल झालं आहे.यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संपर्क संकटात संपला आहे. सततच्या पडणाऱ्या पावसाचा द्राक्ष उडीद,मूग,कांदा पिकाला देखील मोठा फटका बसल्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.
आणखी वाचा
पावसाबाबत हवामान खात्याचा महत्त्वाचा अलर्ट, जोर आणखी वाढणार, आणखी किती दिवस पाऊस पडत राहणार?
























