मुंबईनंतर आता सोलापूर, शिकाऊ डॉक्टरला शिवीगाळ करत मारहाण; गुन्हा दाखल!
सोलापूर जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात एका शिकाऊ डॉक्टरला शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोलापूर : पश्चिम बंगालमधील महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या केल्याचे प्रकरण ताजे आहे. डॉक्टरांच्या याच सुरक्षिततेमुळे सध्या देशभरातील डॉक्टरांकडून संताप व्यक्त केला जात आहे. डॉक्टरांच्या वेगवेगळ्या संस्था रस्त्यावर उतरल्या असून अनेक ठिकाणी काम बंद, लक्षणिक आंदोलने करण्यात आली. डॉक्टरांची सुरक्षा हा कळीचा मुद्दा बनत चालला आहे, डॉक्टरांना मारहाण होण्याचे प्रमाण वाढले आहे, असे म्हणत योग्य त्या उपायोजना कराव्यात अशी मागणी देशभरातील डॉक्टरांकडून केली जात आहे. असे असतानाच आता सोलापुरात एखा शिकाऊ डॉक्टरला शिवीगाळ करत मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमके प्रकरण काय आहे?
मिळालेल्या माहितीनुसार सोलापुरातील एका शिकाऊ डॉक्टरला शिवीगाळ करण्यात आली आहे. रागाच्या भरात या डॉक्टरला एका महिलेने चापटही मारली आहे. संबंधित महिलेविरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात हा प्रकार घडला आहे. अमीना दस्तगीर पठाण असे डॉक्टरला मारहाण करणाऱ्या महिलेचे नाव आहे.
राग अनावर झाला आणि...
आरोपीच्या महिलेच्या मुलीवर गेल्या काही दिवसांपासून सोलापुरातील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र दुर्दैवाने या मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृत्यूची बातमी समजताच अमीना पठाण यांना राग अनावर झाला आणि त्यांनी रुग्णालयातील शिकाऊ डॉक्टरास शिवीगाळ केली. तसेच रागाच्या भरात चापट मारली.
महिलेविरोधात गुन्हा दाखल
रुग्णालय प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेत एम. डी. तय्यब यांच्या फिर्यादीवरून महिलेविरोधात तक्रार दाखल केली आहे. शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा आरोप करत ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. दाखल तक्रारीनंतर बाजार पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कायदा कलम 132, 121(1), 352 सह साथीचे रोग कायदा कलम 3,4 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
मुंबईत डॉक्टरला मारहाण
दरम्यान, पश्चिम बंगालमधील कोलकात्यातील बलात्कार प्रकरण ताजे असतानाच मुंबईतही एका डॉक्टरला मारहाण करण्यात आली. अँटॉप हिल परिसरात दोन कुटुंबांमध्ये भांडण झाले होते. याचे पर्यावसान नंतर हाणामारीत झाले. यातील जखमींना सायन रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यातील एकावर उपचार करत असताना डॉक्टर योग्य पद्धतीनं उपचार करत नाहीत, असं सांगून जखमींच्या नातेवाईकांनी डॉक्टरला शिवीगाळ करत मारहाण केली. या प्रकरणी डॉक्टरांनी पोलिसांत धाव घेतली. डॉक्टरांनी सायन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा :