काळ्या हळदीला एका लाखाचे एक कोटी मिळतात, मुंबईच्या व्यक्तीची अकलूजमध्ये फसवणूक
Black Turmeric : काळ्या हळदीला एक लाखाचे एक कोटी रुपये होतात, असे सांगत मुंबईच्या ठेकेदाराची अकलूजमध्ये फसवणूक झाली आहे.
Solapur Akluj Latest News Update : इंग्लंडमध्ये काळ्या हळदीला एक लाखाचे एक कोटी रुपये मिळतात, असे म्हणत मुंबईच्या एका ठेकेदाराची ठाण्यातील महाराजाने अकलूजमध्ये फसवणूक केली आहे. मुंबईच्या ठेकेदाराला त्या महाराजाने तब्बल 65 लाख रुपयांचा चुना लावलाय. या प्रकरणी अकलूजमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिकचा तपास करत आहेत.
माझ्याकडे असणाऱ्या काळ्या हळदीमध्ये रेडिओअॅक्टिव्ह गुणधर्म आहेत. ही हळद इंग्लंडमध्ये विकल्यास एक लाखाचे एक कोटी रुपये होतील, असे सांगत मुंबईच्या एका ठेकेदाराला ठाण्याच्या ठकसेन महाराजाने 65 लाखाला चुना लावला. विशेष म्हणजे यात दोन शास्त्रज्ञासह अकलूज येथील एका व्यक्तीवर भादंवि 420 , 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई येथील घाटकोपर येथे राहणारे लक्ष्मण सेंगानी यांचा भिवंडी येथील काशिनाथ महाराज यांच्याशी परिचय झाला होता. यावेळी हा ठकसेन महाराजांच्या आपल्या सासुरवाडी असलेल्या पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथे योगेश दावले यांच्याकडे दुर्मिळ काळी हळद असल्याचे सांगितले. यामध्ये चुंबकीय गुणधर्म असून ही हळद रेडिओअॅक्टिव असल्याचे सांगितले.
या हळदीला आंतररार्ष्ट्रीय बाजारात मोठी किंमत असून इंग्लंड येथील व्हिक्टोरिया मेटल कार्पोरेटमध्ये गुंतवल्यास एक लाखाला एक कोटी रुपये मिळतील, असे सांगितल्यावर सेंगाणी यांनी यात गुंतवणूक करण्याची तयारी दाखवली. यासाठी सेंगाणी यांनी पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथे जाऊन या हळदीची दुरून पाहणी केली. यावेळी या या हळदीसमोर ठेवलेले बंद कुलूप आपोआप उघडून सेंगाणी यांचा विश्वास मिळवला. या हळदीमध्ये मोठ्या प्रमाणात रेडिओअॅक्टिव्ह गुणधर्म असल्याने ही जमिनीतून काढण्यासाठी अँटीरेडिएशन किट घ्यावे लागेल, तसेच हळद इंग्लंडमध्ये तपासणीसाठी फी भरावी लागेल. या तपासण्यासाठी दोन शास्त्रज्ञ असावे लागतील, अशी करणे देत सेंगाणी यांच्याकडून वेळोवेळी 64 लाख 45 हजार रुपये उकळले होते. काल सायंकाळी पुन्हा काशिनाथ महाराज , इंग्लंड येथील व्हिक्टोरिया मेटल कार्पोरेट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे कॉर्डीनेटर हेमंत काटे , शास्त्रज्ञ अवधूत शाबासकर आणि अतुल ताम्हाणे हे फिर्यादी सेंगाणी यांच्या सोबत अकलूज येथील योगेश दावले यांच्या घरी पोचले. यावेळी त्यांच्यासोबत BARC अर्थात भारतीय ऍटोमिक रिसर्च सेंटरच्या स्टिकर मधील मोठ्या बॉक्समध्ये ही रेडिओऍक्टिव्ह पावडर अर्थात काळी हळद आणि दुसऱ्या बॉक्समध्ये तपासणीचे साहित्य असल्याचे सांगितले. यावेळी यातील शास्त्रज्ञांनी अँटीरेडिएशन असणारे ड्रेस आणले होते. या हळदीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात रेडिओऍक्टिव्ह ताकद असल्याने हे सांभाळण्यासाठी अजून एक कोटी रुपयाची मागणी या ठकसेन तोलणे यांनी केली. यावेळी सेंगाणी याना संशय आल्याने त्यांनी अकलूज पोलिसांना कळवले.
त्यानंतर पोलीस निरीक्षक रत्नदीप गायकवाड आपल्या पथकासह अकलूज येथील दावले यांच्या घरी पोचल्यावर त्यांना तेथे खूप धूर दिसला. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळावरील सर्व साहित्य आणि सहा जणांना ताब्यात घेत अकलूज पोलीस ठाण्यात आणले. पोलिसी खाक्या दाखवताच या भोंदू महाराजासह, शास्त्रज्ञ आणि तथाकथित व्हिक्टोरिया मेटल कंपनीचा अधिकारी पोपटासारखे बोलू लागले. या प्रकरणात एक लाखाचे एक कोटी मिळवण्याच्या लोभापायी घाटकोपर येथील लक्ष्मण सेंगाणी यांची 64 लाख 45 हजार रुपयाला फसवणूक झाली, असून या टोळीने अजून कोणाला फसवले आहे का? याचा तपस देखील अकलूज पोलिसांनी सुरु केला आहे. या प्रकरणातील फिर्यादी आणि इतर आरोपी घाटकोपर, भवंडी, ठाणे, पुणे परिसरातील आहेत. काळी हळद ठेवलेला एक आरोपी अकलूज येथील आहे. याप्रकरणात सापडलेली पावडर व इतर संशयित वस्तू रासायनिक तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.