Solapur Accident: सोलापूर जिल्ह्यातील मुस्ती ते वळसंग मार्गावर एक भीषण अपघात घडलाय. दुचाकीवरून कामावर निघालेल्या तीन बांधकाम कामगारांचा जागीच मृत्यू झाला आहे. अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. मृतांमध्ये देविदास दुपारगुडे (वय 40), नितीन वाघमारे (वय 35) आणि हनुमंत राठोड (वय 40, सर्व रा. मुस्ती तांडा) यांचा समावेश आहे.
नेमके घडले काय?
मंगळवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास मुस्ती गावाजवळील तळ्याजवळ ही भीषण दुर्घटना झाली. हे तिघेही बांधकाम कामगार असून, कामासाठी मुस्ती गावातून वळसंग येथे निघाले होते. ते तिघं दुचाकीवरून जात असताना समोरून आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांना जोरात धडक दिली. या अपघातात तिघांचाही जागीच मृत्यू झाला.
अपघातानंतर काही वेळातच परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक नागरिकांनी तातडीने वळसंग पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात रवाना करण्यात आले असून, याप्रकरणी पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, धडक देणाऱ्या वाहनाचा आणि त्याच्या चालकाचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. अपघात घडवून वाहनचालकाने घटनास्थळावर न थांबता पळ काढल्यामुळे अज्ञात वाहन कोणते होते, हे स्पष्ट झालेले नाही.
अपघातस्थळी पंचनामा, वाहनाचा तपास सुरु
या दुर्घटनेमुळे मुस्ती गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. मृत कामगारांचे कुटुंब आर्थिकदृष्ट्या हलाखीच्या परिस्थितीत असून, कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. प्रशासनाने संबंधित कुटुंबीयांना तातडीने मदत जाहीर करावी, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत. दरम्यान, वळसंग पोलिसांनी अपघातस्थळाची पाहणी करून पंचनामा केला असून, आसपासच्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे धडक देणाऱ्या वाहनाचा तपास सुरू आहे.
पंढरीला निघालेल्या भोळ्याभाबड्या वारकऱ्यांना फसवलं
आषाढी एकादशीनिमित्त (Ashadhi Ekadashi 2025) लाखो वारकरी पंढरपूरच्या (Pandharpur) दिशेने विठ्ठलनामाचा गजर करत वाटचाल करत असताना, काही फसवणूक करणाऱ्या टोळ्यांनी या भक्तिभावाला काळिमा फासणारा प्रकार घडवला आहे. थेट ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात सहभागी असलेल्या काही भाविकांना मंदिर प्रवेशासाठी बनावट 'टोकन दर्शन' पास विकल्याची घटना समोर आली आहे. ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात चालत असलेल्या काही भाविकांना तुम्हाला देवाच्या टोकन दर्शनाचे पास 100 रुपयात देतो, असे सांगून सासवड परिसरात जुन्या पासावर हे नवीन डुप्लिकेट पास बनवून दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
हेही वाचा:
























