(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मोठी बातमी! सोलापुरात इंधन टँकर चालकांचा संप मागे, पोलिसांच्या मध्यस्थीने पेट्रोल-डिझेल पुरवठा सुरु
Solapur : पोलिसांनी कायद्यासंदर्भात प्रबोधन केल्याने टँकर चालकांनी संप मागे घेत वाहतूक सुरू केली आहे. तर, वाहतूक सुरु केली असली तरीही कायद्यातील तरतुदींना मात्र वाहन चालकांचा विरोध कायम आहे.
सोलापूर : नवीन वाहन कायद्याला (New Vehicle Act) विरोध करण्यासाठी देशभरात ट्रक चालक (Truck driver) आणि इंधन टँकर (Tanker) चालकांनी संपाची हाक दिल्याने अनेक ठिकाणी पेट्रोल-डीझेलची (Petrol-Diesel) टंचाई निर्माण झाली आहे. दरम्यान, सोलापूर (Solapur) जिल्ह्यात देखील नवीन वाहतूक कायद्याच्या विरोधात पेट्रोल-डिझेल टँकर चालक आक्रमक होतांना पाहायला मिळत आहे. तर, सोलापुरातील हिंदुस्तान पेट्रोलियम येथील डेपो मधील टँकर चालकांनी संप पुकारला होता. मात्र, पोलिसांनी कायद्यासंदर्भात प्रबोधन केल्याने टँकर चालकांनी संप मागे घेत वाहतूक सुरू केली आहे. तर, वाहतूक सुरु केली असली तरीही कायद्यातील तरतुदींना मात्र वाहन चालकांचा विरोध कायम आहे.
नवीन वाहन कायद्याला विरोध करत सोलापुरातील हिंदुस्तान पेट्रोलियम येथील डेपो मधील टँकर चालकांनी संप पुकारला होता. प्रत्येक अपघातामध्ये केवळ वाहन चालकांना दोषी ठरवले जाते, अनेक वेळा चूक समोरच्याची असते. मात्र, त्याकडे कोणीही लक्ष देत नाही. चालकांना केवळ दहा ते पंधरा हजार रुपये पगार असतो, अशी परिस्थिती असताना लाखो रुपयांचा दंड कसा भरायचा? असा सवाल वाहन चालकांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, पोलिसांनी कायद्यासंदर्भात प्रबोधन केल्याने टँकर चालकांनी संप मागे घेत वाहतूक सुरू केली आहे. तर, सोलापुरातील तीन पेट्रोल-डिझेल डेपोवर पोलिसांनी सुरक्षा वाढवली आहे. रस्त्यातही पोलिसांचे पेट्रोलिंग सुरू राहणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच, पोलिसांच्या बंदोबस्तात इंधन वाहतूक सुरु करण्यात आली आहे. पोलिसांच्या मध्यस्थीने सोलापूरसह 6 जिल्ह्यातील पेट्रोल डिझेल पुरवठा सुरु झाला आहे.
संपाला रुग्णवाहिका चालकांचा पाठिंबा
नवीन वाहतूक कायद्याविरोधात वाहनचालकांनी पुकारलेल्या संपास सोलापुरातील रुग्णवाहिका चालकांनी देखील पाठींबा दिला आहे. मात्र, अत्यावश्यक सेवेत असल्याने रुग्णवाहीका चालक संपात सहभागी होणार नाहीत. शासनाने वाहन चालकांच्या भूमिका लक्षात घेऊन संपावर तोडगा काढावा अशी मागणी सोलापुरातील रुग्णवाहिका चालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
अनेक पेट्रोल पंपावर गर्दी...
नवीन वाहन कायद्याच्या विरोधात ट्रक चालकांनी पुकारलेल्या संपाचे परिणाम कालपासून सोलापुरात देखील पाहायला मिळाले. सोलापूर शहरातील पेट्रोल पंपांवरती वाहन चालकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र सोमवारी रात्री दिसून आले. पेट्रोल मिळणार नाही या भीतीने वाहन चालक टाकी फुल करून घेत असल्याचे पाहायला मिळत होते. दरम्यान, आज सकाळी देखील काही ठिकाणी अशीच गर्दी होती. मात्र, असे असतानाच आता पोलिसांच्या पुढाकाराने सोलापुरात इंधन टँकर चालकांनी संप मागे घेतला असल्याने इंधन टंचाई निर्माण होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: