Pandharpur : विठ्ठलाचा लाडू प्रसाद अहवाल गेल्यावर्षीचा असल्याचा मंदिर समितीचा खुलासा, नाशिकच्या संस्थेचा ठेका रद्द
Pandharpur : विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचा लाडू प्रसाद बनवताना आरोग्य विभागाचे मानांकन पळाले जात नव्हते आणि 140 ग्राम ऐवजी केवळ 120 ते 122 ग्राम वजनाचे लाडू देऊन भाविकांचीही फसवणूक होत होती.
सोलापूर : विधानसभा आणि विधानपरिषदेच्या पटलावर ठेवलेला श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचा लाडू प्रसाद अहवाल गेल्या वर्षीचा असून संबंधित ठेकेदारांचा ठेका रद्द करून आता मंदिर समिती लाडू प्रसाद बनवत असल्याचा खुलासा मंदिर समितीचे (Pandharpur Vitthal Mandir) व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी केला आहे. वास्तविक मंदिर समितीकडून देण्यात येणार लाडू प्रसाद हलक्या दर्जाचा आणि कमी वजनाचा असून यामुळे भाविकांची फसवणूक होत असल्याचे वास्तव ABP माझाने 8 जुलै 2022 रोजी महाराष्ट्रासमोर आणले होते. यानंतर तातडीने अन्न व औषध प्रशासनाने इथे छापा टाकला असता हे उघड झाले.
विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचा लाडू प्रसाद बनवताना आरोग्य विभागाचे मानांकन पळाले जात नव्हते आणि 140 ग्राम ऐवजी केवळ 120 ते 122 ग्राम वजनाचे लाडू देऊन भाविकांचीही फसवणूक होत होती. यानंतर मंदिर समितीने नाशिक येथील संस्थेचा ठेका रद्द केला होता .
पंढरपूरचे विठ्ठल मंदिराचे कामकाज पंढरपूर मंदिरे अधिनियम, 1973 अन्वये चालविण्यात येते. या मधील तरतुदीनुसार मंदिर समितीचा लेखापरीक्षण अहवाल आणि त्यावर माननीय धर्मादाय आयुक्त यांनी दिलेल्या निदेशांचा अनुपालन अहवाल राज्याच्या विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहात सादर करण्याची तरतूद आहे.
या तरतुदीनुसार सन 2021 ते 2022 या आर्थिक वर्षाचा लेखापरीक्षण अहवाल आणि त्याचा अनुपालन अहवाल विधानमंडळाच्या विधानसभा व विधानपरिषद या दोन्ही सभागृहांमध्ये दिनांक 11 डिसेंबर, 2023 रोजी पटलावर ठेवण्यात आला होता.
यातील आक्षेप घेतलेला सदरचा बुंदी लाडूप्रसाद आऊटसोर्सिंग पद्धतीने खरेदी करण्यात येत होता. याबाबत सदरचे लेखापरीक्षण अहवालामध्ये काही आक्षेप आले होते. तसेच सदरचा लाडूप्रसाद संबंधित पुरवठाधारकाकडून पुरेसा व चांगल्या गुणवत्तेचा मिळत नसल्यान, त्यांचा ठेका रद्द करण्यात आला.
मंदिर समितीमार्फत आवश्यक कच्चा माल खरेदी करून बुंदीचा लाडूप्रसाद तयार करून भाविकांना उपलब्ध करून देण्यात येत आहे. याबाबत अन्न व औषध प्रशासनाच्या सर्व नियमांचे पालन करण्यात येत आहे. त्यांच्याकडून तपासणी करून घेऊन व त्यांनी वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करून लाडू प्रसादाची निर्मिती करण्यात येत असल्याचा खुलासा आता मंदिर व्यवस्थापनाने केला आहे.
अन्न व औषध प्रशासनाच्या सर्व नियमांचे पालन करूनच लाडू प्रसादाची निर्मिती करण्यात येत असून, भाविकांना चांगल्या गुणवत्तेचा व पुरेशा प्रमाणात बुंदी लाडू प्रसादाची उपलब्ध होईल याची मंदिर समितीच्या वतीने दक्षता घेण्यात येत असल्याचे व्यवस्थापनाने सांगितले आहे . मंदिर समितीने 13 एप्रिल 2023 पासून हा लाडू प्रसाद बनविण्यास सुरुवात केला असून गेल्या आठ महिन्यात जवळपास 5 कोटी रुपयांचा लाडू प्रसाद भाविकांनी खरेदी केल्याचेही व्यवस्थापनाने सांगितले आहे .
ही बातमी वाचा: