Pandharpur News : विठुरायाला अज्ञात भाविकाकडून आजवरचे सर्वात मोठे दान अर्पण, कोणकोणत्या वस्तूंचा समावेश?
Pandharpur News : पंढरपूरच्या विठुरायाच्या चरणी आजवरचे सर्वात मोठे दान अर्पण झाले आहे. जालना येथील एका महिला भाविकाने विठ्ठल रुक्मिणीचरणी हे दान अर्पण केले आहे.
Pandharpur News : गोरगरिबांचा देव असलेल्या पंढरपूरच्या (Pandharpur) विठुरायाच्या (Vitthal) चरणी आजवरचे सर्वात मोठे दान अर्पण झाले आहे. जालना (Jalna) इथल्या एका महिला भाविकाने विठ्ठल आणि रुक्मिणी (Vitthal Rukmini) चरणी हे दान अर्पण केले आहे. यात जवळपास पावणे दोन कोटी रुपयांच्या सोने चांदीच्या दागिन्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या भाविकाने आपले नाव गुप्त ठेवण्याची अट घातली असून या गुप्तदानासाठी कोणताही सत्कार स्वीकारण्यासही या दात्याने नम्रपणे नकार दिला आहे.
खरंतर पंढरपूरचा विठुराया तसा नवसाचा देव कधीच नव्हता आणि नाही, मात्र तरीही देशभरातील भाविक देवाला आपल्या इच्छा साकडे घालतात आणि देव त्यांच्या इच्छांची पूर्तता देखील करतो. अशावेळी हे भाविक देवाला बोललेले नवस मंदिरात येऊन पूर्ण करतात. काही भाविक पैसे अथवा सोन्या चांदीचे विठ्ठलाच्या चरणी अर्पण करतात.
दानामध्ये कोणकोणत्या वस्तूंचा समावेश?
आज वसंतपंचमीच्या (Vasant Panchami) मुहूर्तावर विठुराया आणि रुक्मिणी मातेच्या विवाहनिमित्त (Vitthal Rukmini Wedding Ceremony) ही अनमोल भेट जालन्यातील महिला भाविकाने अर्पण केली आहे. या दानामध्ये विठ्ठल आणि रुक्मिणीला सोन्याचे मुकुट, विठ्ठल आणि रुक्मिणी मातेला मोहोन माळ, रुक्मिणी मातेला कोल्हापुरी साज, पाटल्या, बांगड्या, मंगळसूत्र, जोडवी असे सोन्याचे दागिने दिले आहेत. याशिवाय देवाच्या नित्योपचारासाठी चांदीचे मोठे ताट, वाटी, समई, तांब्या, भांडी, ताम्हण, पळी आणि देवाचा चांदीचा आरसा अशा किमती वस्तू देखील अर्पण केल्या आहेत.
विठ्ठल-रुक्मिणीचा आज शाही विवाह सोहळा
दरम्यान विठ्ठल मंदिरात आज दुपारी बारा वाजता विठ्ठल आणि रुक्मिणीचा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न होणार आहे. या निमित्त पंढरपुरात जय्यत तयारी सुरु आहे. विठ्ठल रुक्मिणीच्या या शाही विवाह सोहळ्यासाठी खास चेन्नई आणि बंगलोर इथून विवाहासाठीचे रेशमी पांढरे पोशाख आले आहेत. बंगळूरू इथल्या एका भाविकाने विठ्ठल रुक्मिणी यांच्या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने पोषाख भेट दिला आहे. हा पोषाख आज देवांना परिधान करण्यात येणार आहे.
विवाह पाहण्यासाठी गर्दी होण्याची शक्यता
दरम्यान आज प्रजासत्ताक दिन असल्याने नागरिकांना सुट्टी आहे. त्यामुळे विठ्ठल-रुक्मिणीचा विवाह याचि देही याचि डोळा पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शन व्यवस्था करण्यात येणार आहे.
हेही वाचा