पंढरपूर विकास आराखड्यामुळे नागरिक, व्यापाऱ्यांना विस्थापित होण्याची भीती; पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची आज प्रशासनासोबत बैठक
Pandharpur News : राधाकृष्ण विखे पाटील हे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत. या बैठकीत किमान अवास्तव पाडापाडी टाळण्याचा निर्णय झाल्यास हा संघर्ष कमी होऊ शकणार आहे.
Pandharpur News : पंढरपूर (Pandharpur) शहर आणि मंदिर परिसराच्या विकासासाठी राज्य शासनाने हाती घेतलेल्या विकास आराखडा आणि माऊली कॉरिडॉर (Mauli Corridor) यामुळे हजारो नागरिक आणि व्यापाऱ्यांना विस्थापित व्हावे लागणार असल्याचे वास्तव एबीपी माझाने वारंवार समोर आणले. यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे आणि भीतीचे वातावरण असून या आराखड्याच्या विरोधात एक संघर्ष समिती गठित करण्यात आली आहे. एबीपी माझाने दाखवलेल्या या वास्तवानंतर आज (17 नोव्हेंबर) दौऱ्यावर असणारे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) हे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत. या बैठकीत किमान अवास्तव पाडापाडी टाळण्याचा निर्णय झाल्यास हा संघर्ष कमी होऊ शकणार आहे.
चौफाळा ते महाद्वार घाट या माऊली कॉरिडॉरच्या रुंदीमुळे हे भीतीचे वातावरण असून जिथे केवळ 14 मीटरचा रस्ता आहे तिथे 120 मीटर रुंदीचा रस्ता करण्याचे प्रस्तावित असल्याचे समोर आल्याने नागरिकांनी तीव्र विरोध करण्यास सुरुवात केली आहे. याशिवाय मंदिराकडे येणारे आणि चंद्रभागा घाटाकडे जाणाऱ्या जवळपास 22 रस्त्यांच्या चौपटीपेक्षा जास्त रुंदीचा प्रस्ताव असल्याने हजारोंच्या संख्येने नागरिकांना याचा फटका बसणार आहे. हा आराखडा सर्वसामान्य नागरिकांच्या घरावर बुलडोझर चालवणारा असून गरजेएवढे रुंदीकरण व्हावे हीच भूमिका नागरिकांची आहे.
काशी वाराणसी कॉरिडॉरच्या धर्तीवर पंढरपुरात माऊली कॉरिडॉर प्रस्तावित
विठ्ठल मंदिर परिसरातील चौफाळा ते महाद्वार घाट हा माऊली कॉरिडॉर हा खरा वादाचा मुद्दा आहे. मंदिर परिसरातील रस्ते थेट 200 फुटांपर्यंत वाढवण्याचे नियोजन प्रशासन करत आहे. सध्या मंदिर परिसरात केवळ 60 फुटांचे रस्ते असून अजून जवळपास 140 फूट रुंदी वाढल्याने केवळ या कॉरिडॉरमुळे जवळपास 1 हजारांपेक्षा जास्त नागरिकांची घरे आणि दुकाने जमीनदोस्त होणार असल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. वास्तविक मंदिर परिसरात यापूर्वी 1982 साली रस्ता रुंदीकरण करण्यात आलं होतं. मात्र भाविकांची वाढती संख्या आणि अपुरे पडणारे रस्ते यामुळे काशीच्या वाराणसी कॉरिडॉरच्या धर्तीवर हा माउली कॉरिडॉर करायचे प्रस्तावित आहे. या कॉरिडॉरमध्ये महाद्वार घाटावरील श्रीमंत अहिल्यादेवी होळकर आणि शिंदे यांच्या पुरातन आणि ऐतिहासिक वास्तू देखील बाधित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा कॉरिडॉर मंदिर परिसरात न करता चंद्रभागा वाळवंट अथवा 65 एकर भक्ती सागर याठिकाणी करावा अशी नागरिकांची भूमिका आहे.
या आराखड्यात मंदिर परिसरातील एकूण 39 रस्ते मोठे होणार असून सध्या हे रस्ते केवळ 1 ते 3 मीटर आहेत.त्याची रुंदी 5 ते 12 मीटरपर्यंत करायचे प्रस्तावित असल्याने यामध्ये हजारोंच्या संख्येने नागरिकांना विस्थापित व्हावे लागणार आहे. यामधील रस्ते हे शहराच्या डेव्हलपमेंट प्लॅनमधील असल्याने आता या भागातील नागरिकांच्या घरावर मार्किंग करण्यास सुरुवात केली जाणार असल्याचं मुख्याधिकारी अनिकेत माली यांनी सांगितलं. या रस्त्यांपैकी 22 रस्ते सुरुवातीला हाती घेण्यात येणार असून यात चंद्रभागा नदीकडे जाणाऱ्या सर्व 9 घाटांच्या रस्त्यांचे रुंदीकरण होणार आहे. याशिवाय मंदिराला जोडणारे सर्व रस्त्यांचा यात समावेश असून यात हरिदासांचा काल्याचा वाडा असे वारकरी संप्रदायाच्या जिव्हाळ्याच्या काही ऐतिहासिक वास्तूंचा समावेश आहे.
पालकमंत्र्यांच्या बैठकीत काय होणार?
कार्तिकी एकादशीच्या शासकीय महापूजेसाठी आल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूर कॉरिडॉरची घोषणा केली होती. आता नागरिकांच्या तीव्र विरोधानंतर शिंदे-फडणवीस सरकार काय भूमिका घेणार याकडे बाधित होणारे हजारो नागरिक डोळे लावून बसले आहेत. शिवाय पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील प्रशासनासोबत बैठक घेणार असून याकडे देखील लक्ष लागलं आहे.
संबंधित बातमी
पंढरपूर विकास आराखडा आणि माऊली कॉरिडॉर वादात अडकणार, मनसे हायकोर्टात याचिका दाखल करण्याच्या तयारीत