Bhagirath Bhalke : राष्ट्रवादीला झटका, भगीरथ भालके आज बीआरएस प्रमुख चंद्रशेखर राव यांची भेट घेणार, भालकेंसाठी खास विमान सोलापुरात दाखल
Pandharpur News : बीआरएसने (BRS) महाराष्ट्रात जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. त्यांच्या हाती पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील राष्ट्रवादीचा तगडा तरुण उमेदवार लागल्याने राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का असणार आहे
Pandharpur News : निवडणुकीचे पडघम वाजण्यास अजून बराच कालावधी असताना बीआरएसने (BRS) महाराष्ट्रात जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. त्यांच्या हाती पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील राष्ट्रवादीचा तगडा तरुण उमेदवार लागल्याने राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का असणार आहे. भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) यांना नेण्यासाठी खास विमान सोलापुरात दाखल झाले आहे. थोड्याच वेळात भगीरथ भालके हैदराबादकडे रवाना होणार आहेत. आज सायंकाळी चंद्रशेखर राव (K Chandrashekar Rao) यांच्या बैठकीनंतर चित्र स्पष्ट होईल.
भगीरथ यांना नेण्यासाठी तेलंगणाहून खास विमान सोलापूरला
पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात गेल्या पोटनिवडणुकीत 1 लाख 5 हजार मते घेऊन अगदी थोडक्या मतांनी पराभूत झालेले भगीरथ भालके यांना राष्ट्रवादीने डावलल्याने भालके गट नाराज होता. यातच भगीरथ यांची काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या सोबत देखील भेट झाली होती. दरम्यान नाराज भालके यांना आपल्या गोटात घेण्यासाठी तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी संपर्क साधत भेटीचे निमंत्रण दिले. आज भगीरथ यांना नेण्यासाठी तेलंगणाहून खास विमान सोलापूरला पाठवले आहे.
2024 ची विधानसभा निवडणूक लढवणारच
आज भगीरथ भालके हे सपत्नीक टीआरएसचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष शंकर आण्णा धोंडगे यांच्यासमवेत हैदराबाद इथे जाणार असून आज सायंकाळी चंद्रशेखर राव यांच्यासोबत त्यांची भेट होणार आहे. दिवंगत आमदार भारत नाना भालके यांनी पक्षासाठी एवढे काम करुनही अडचणीच्या काळात आपल्याला राष्ट्रवादीने डावलले. गरज असताना आपल्या पाठीशी नेते उभे न राहिल्याने आपल्या अडचणी वाढत गेल्या. राज्यात तेंव्हा सत्ता असूनही आपल्याला राष्ट्रवादीने कोणतीच मदत केली नसल्याची खंत भगीरथ भालके यांनी बोलून दाखवली. आपले वडील कै भारत भालके यांनी नेहमीच जनता हा पक्ष मानून काम केल्याने सलग तीन वेळा ते वेगवेगळ्या पक्षातून विजयी झालेले होते. आता त्याच पद्धतीने जनता हा पक्ष मानून मी काम करणार असून बीआरएस पक्षाने दिलेल्या निमंत्रणाबाबत आपल्या गटातील ज्येष्ठ आणि तरुण कार्यकर्त्यांशी चर्चा केल्याचे भगीरथ भालके यांनी सांगितले. आगामी 2024 ची विधानसभा निवडणूक आपण कोणत्याही परिस्थितीत लढवणार असून जिंकणार देखील असल्याचा विश्वास भगीरथ भालके यांनी माझाशी बोलताना व्यक्त केला. समोर उमेदवार कोण याचा मला कोणताही फरक पडत नसून जनता माझ्यासोबत असल्याचा दावा भगीरथ भालके यांनी केला आहे.
भालकेंच्या नाराजीचा फायदा बीआरएसने उचलला
काही दिवसापूर्वी विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर आले असता शरद पवार यांनी अभिजीत पाटील यांना पक्षात प्रवेश देत 2024 च्या विधानसभा उमेदवारीचे संकेत दिल्यानंतर भालके गट नाराज झाला होता. दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत भगीरथ भालके यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली होती. या निवडणुकीत भाजपचे समाधान अवताडे यांनी त्यांचा अडीच हजार मतांच्या फरकाने पराभव केला होता. यावेळी भगीरथ भालके यांना 1 लाख 5 हजार मते मिळाली होती. मात्र नंतर शरद पवार यांनी भगीरथ भालके याना डावलून अभिजीत पाटील यांना जवळ केल्याने भालके यांना मानणारा गट नाराज होता. आता याच नाराजीचा फायदा बीआरएसने उचलला असून भगीरथ भालके यांच्यासारखा तगडा उमेदवार गळाला लावण्यात चंद्रशेखर राव यशस्वी झाले आहेत. आज सायंकाळी भालके आणि राव यांच्या भेटीनंतर पुढचे चित्र स्पष्ट होणार असले तरी बीआरएस ही भाजपसह लोकशाही आघाडीची देखील डोकेदुखी ठरणार असल्याचे चित्र आहे.
हेही वाचा