मोठी बातमी! पंढरपुरात एमआयडीसी होणार; बेरोजगारांना रोजगार मिळणार
पोटनिवडणुकीत निवडून आल्यावर आमदार अवताडे यांनी मंगळवेढ्याच्या पाण्याचा आणि पंढरपूरच्या एमआयडीसीचा प्रश्न लावून धरल्याने आता त्यांना यात यश आले आहे.
सोलापूर : गेल्या अनेक वर्षांपासून बेरोजगार तरुणांच्या मागणीला अखेर न्याय देण्यास आमदार समाधान अवताडे याना मोठे यश आले आहे. पंढरपूरसाठी एमआयडीसीला (Pandharpur MIDC) मंजुरी मिळाल्याने आज शकडो तरुणांनी आमदार अवताडे यांच्यासह शहरात मोठा जल्लोष साजरा केला. पंढरपूर हे तीर्थक्षेत्र असून परिसर ऊस, फळबागा असा केवळ शेती व्यवसाय होत असल्याने येथील सुशिक्षित तरुण परिसरातील शेकडो तरुण कामाच्या शोधात मोठमोठ्या शहरात जात असतात.
गेल्या अनेक वर्षांपासून पंढरपुरात अद्ययावत एमआयडीसी उभारण्याची मागणी केली जात होती. निवडून येणार प्रत्येक आमदार पंढरपुरात एमआयडीसी उभी करण्याची आश्वासने देत होते मात्र कोणीही यासाठी प्रयत्न केले नव्हते. पोटनिवडणुकीत निवडून आल्यावर आमदार अवताडे यांनी मंगळवेढ्याच्या पाण्याचा आणि पंढरपूरच्या एमआयडीसी चा प्रश्न लावून धरल्याने आता त्यांना यात यश आले आहे.
54 एकर क्षेत्रावर उभी राहणार एमआयडीसी
पंढरपूर शेजारी असणाऱ्या कासेगाव हद्दीतील 54 एकर क्षेत्रावर एमआयडीसीला शासनाने मंजुरी दिली असून हे क्षेत्र औद्योगिक क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. आज सकाळी आमदार अवताडे पंढरपूरमध्ये येताच शेकडो तरुणांनी त्यांची जंगी मिरवणूक काढून त्यांना विठ्ठल मंदिरापाशी आणले . येथे हा शासनाचा आदेश आमदार अवताडे यांनी देवाच्या पायावर ठेवून दर्शन घेतले . लवकरच याठिकाणी एमआयडीसीचे भूमीपूजन केले जाईल असे सांगत आता आपल्या भागातील तरुणांना येथील गरजेनुसार व्यवसाय उभारण्यास मदत होईल असे सांगितले .
मोठे व्यवसाय पंढरपूरात सुरू होणार
विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर यांच्यासोबत टाटा व अंबानी या दोन मोठ्या उद्योजकांना भेटून एखादा मोठा व्यवसाय पंढरपूरमध्ये सुरु करण्याची विनंती केल्याचेही यावेळी आमदार समाधान अवताडे यांनी सांगितले . लवकरच विधानसभा निवडणूक होणार असताना आमदार अवताडे यांनी पंढरपूरमध्ये एमआयडीसी मंजूर केल्याने हा निवडणुकीपूर्वीच मास्टर स्ट्रोक ठरू शकणार आहे .
हे ही वाचा :
पंढरपूरला जाणारी रेल्वे आटपाडीमार्गेच जाईल, दिल्लीत प्रयत्न ; विशाल पाटलांचा भरसभेत शब्द