पंधरा वर्ष दररोज चॉकलेट वाटले, लोक म्हणाले चॉकलेट वाटून कोण सरपंच होतं? सोलापूरच्या पठ्ठ्याने करुन दाखवलं!
Solapur News: सरपंच पदाचे उमेदवार असणारे नारायण देशमुख यांच्या चॉकलेट प्रेमाने त्यांनी धनशक्तीवर मात करत सरपंचपद खेचून आणले .
सोलापूर : ग्रामपंचायतीच्या झालेल्या निवडणुकांमध्ये (Gram Panchayat Election) राज्यात अनेक वेगळ्या लढती पाहायला मिळाल्या होत्या. मात्र पंढरपूर तालुक्यातील (Pandharpur News) ईश्वर वठार गावातील सरपंचाच्या चॉकलेटचा सध्या जोरदार बोलबाला होऊ लागला आहे . पंढरपूर तालुक्यात फक्त दोन ग्रामपंचायतींची निवडणूक लागली होती. यातील ईश्वर वठार येथे शिक्षक नेते सुभाषराव माने सर यांची गेल्या 35 वर्षांपासून सत्ता होती. गावातील राजकारणात दोन्हीही गट भाजपच्या परिचारक गटाचे असल्याने निवडणुकीत जोरदार पैशाच्या वापराबाबत संपूर्ण निवडणूक काळात चर्चा होती. मात्र यातही सरपंच पदाचे उमेदवार असणारे नारायण देशमुख यांच्या चॉकलेट प्रेमाने त्यांनी धनशक्तीवर मात करत सरपंचपद खेचून आणले .
नारायण देशमुख हे गावातील मनमिळावू माणूस म्हणून प्रसिद्ध पण त्याचबरोबर चॉकलेट वाटण्यासाठी ते जास्त प्रसिद्ध होते. गेल्या 15 वर्षांपासून ते गावात आले की पहिल्यांदा सगळ्यांना आपल्या खिशातील चॉकलेट वाटत आणि मग आपल्या कामाला लागत सुरूवात करत होते. त्यामुळे त्यांची बुलेट गावात आली की गावातील लहान मोठे त्यांच्याभोवती गोळा होत असे. या सर्वांना ते पहिल्यांदा आपल्या खिशातील चॉकलेट देत आणि मग लोकांच्या अडीअडचणी सोडवत होते.
चॉकलेटची गोडी 300 मतांची आघाडी
गावात कोणताही तंटा , वाद असला तरी नारायण देशमुख पहिल्यांदा दोन्ही गटाला आधी चॉकलेट देत आणि मग गोड बोलून वादावर तोडगा काढत होते. यावेळी निवडणुकीला उभारल्यावर चॉकलेट वाटून कोण सरपंच होते का अशा शब्दात त्यांची सभांतून हेटाळणी होत होती. पण त्यांनी आपली सवय सोडली नाही आणि मतदान झाल्यावर या चॉकलेटचा गोडवा विरोधकांचे तोंड कडू करून गेला. या निवडणुकीत 1400 मतदान असणाऱ्या गावात जवळपास 300 मतांची आघाडी घेऊन गावाने नारायण देशमुख यांना सरपंच केले. निवडून आल्यावर गावांनी गुलालात त्यांना भिजवून काढले . पण यानंतरही त्यांनी विजयी झाल्यावर पहिल्यांदा आपल्या जवळील चॉकलेट लहान मुलांना वाटले आणि मगच सत्काराचा हार घेतला.
चॉकलेटच्या गोडीची धनशक्तीवर मात
पंढरपूरचे दिवंगत आमदार भारत भालके हे देखील मुलांना चॉकलेट वाटून तीन वेळा आमदार झाले. तर मग मी चॉकलेट वाटतो यात काय वाईट असा सवाल ते करतात. त्यांच्या पक्षाबाबतही बरेच दावे येत आहे. भाजपचा पहिला बूथ सांभाळणारे ते कार्यकर्ता असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले . गावकरीही त्यांच्याबाबत तेवढ्याच प्रेमाने बोलतात. त्यांच्या चॉकलेटच्या जोरावर आजवर गावातील अनेक तंटे आणि वाद मिटल्याचे सांगतात . गेले अनेक वर्षे चॉकलेटची गोडी पसरवणाऱ्या नारायण देशमुख यांना गावानेही सरपंच केले आहे.
हे ही वाचा :
Ahmednagar : नादच केला पण वाया नाही गेला; 32 वर्षे प्रत्येक निवडणूक लढला, लोकांनी दरवेळी पाडलं, शेवटी सरपंचपदाचा गुलाल उधळलाच