शाहजीबापूच्या मतदारसंघात शरद पवार-देवेंद्र फडणवीस आमनेसामने, भाषणांकडे राज्याचे लक्ष
राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस सांगोल्यात आमने सामने .. दोघांच्याही भाषणांकडे राज्याचे लक्ष
Sharad Pawar And Devendra Fadnavis : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा एकाच मंचावर एकत्रित येताना दिसणार आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे.राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर शरद पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकाच मंचावर भाषण करणार आहेत. यावेळी आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडण्याची शक्यता आहे. पुतळा अनावरण कार्यक्रमात बोलताना दोन्ही नेते एकमेकांविषयी काय बोलणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे? याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या मतदारसंघात दोन दिग्गज नेते आमनेसामने असतील. त्यामुळे राज्याचे लक्ष लागलेय.
पुण्यातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमात हे दोघेही एकाच मंचावर होते मात्र यावेळी पंतप्रधानांसोबत राज्याचे राज्यपाल , मुख्यमंत्री , अजितदादा पवार वगैरे सर्वचजण उपस्थित असल्याने या शासकीय कार्यक्रमात टोलेबाजी पाहायला मिळाली नव्हती. मात्र सांगोला येथे स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमात हे दोन नेते आमने सामने येणार असल्याने पहाटेच्या शपथविधीबाबत दोघात रंगलेले आरोप-प्रत्यारोप पुन्हा समोर दिसणार का याची उत्सुकता सर्वांना आहे .
शेकापचे दिवंगत नेते भाई गणपतराव देशमुख यांच्या स्मारकाचे अनावरण होणार असून या कार्यक्रमासाठी शरद पवार सोलापूर येथून अडीच वाजता पोचणार आहेत . तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दुपारी सव्वा दोन वाजता सांगोल्यात येणार आहेत. तीन वर्षांपूर्वी देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांच्या पहाटेच्या शपथविधी हा शरद पवार यांच्या संमतीने झाल्याचे फडणवीस यांनी सांगितले होते. यानंतर शरद पवार यांनी फडणवीस यांना बरीच टोलेबाजी केली होती. याला फडणवीस यांनीही उत्तर देत अर्धसत्य समोर आले, आता उरलेले अर्धसत्यही लवकरच समोर येईल असे सांगितले होते. यानंतर अजित पवार यांनी राष्ट्रवादीमधून फारकत घेत सत्तेत सामील होण्याचा निर्णय घेतला.
अजित पवार फूटल्यानंतर शरद पवार यांनी भाजपाला विरोध करणार असल्याची भूमिका घेत INDIA च्या बैठकीत सहभाग घेतला होता. यातच शनिवारी पुण्यात पुन्हा शरद पवार आणि अजितदादा यांची भेट झाल्यानंतर आजच्या कार्यक्रमात कोण काय बोलणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. या कार्यक्रमानंतर दुपारी चार वाजता फडणवीस पुन्हा मुंबईकडे रवाना होणार असून शरद पवार हे संध्याकाळी ५ वाजता सांगोला येथे आयोजित केलेल्या ऑरगॅनिक शेतीच्या एका कार्यक्रमात हजेरी लावणार आहेत.