Jayant Patil : 'महाराष्ट्राचा इतिहास बदलण्याचं पाप कोणाच्या तरी मनात'; जयंत पाटलांचा देवेंद्र फडणवीसांवर आरोप
Jayant Patil on Devendra Fadnavis : छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटल्याचा इतिहास हा काँग्रेसने आपल्याला शिकवला वास्तविक महाराजांनी सुरत लुटले नव्हते, असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले होते.
सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी (Chhatrapati Shivaji Maharaj) सुरत लुटल्याचा इतिहास हा काँग्रेसने (Congress) आपल्याला शिकवला वास्तविक महाराजांनी सुरत लुटले नव्हते, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले होते. आता यावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केला आहे. महाराष्ट्राचा इतिहास बदलण्याचं पाप कोणाच्या तरी मनात असल्याचे जयंत पाटील यांनी म्हटले आहे. टेंभुर्णी येथे सूरज देशमुख व रावसाहेब देशमुख यांच्या पक्षप्रवेश कार्यक्रमात ते बोलत होते.
जयंत पाटील म्हणाले की, लोकसभेला तुम्ही विजयसिंह मोहिते पाटील यांच्या नेतृत्वात लाट कशी असते हे दाखवून दिलं. लोकसभा झाल्यानंतर सरकार जाग झालं, सरकार आता घाबरलं आहे. सरकारनं तिजोरीचे दार उघडलं नाही तर बाजूला काढून ठेवलं आणि सरकार मिळेल त्या गोष्टी देतात. सरकार तुम्ही कपडे मागितले तर कपडे देखील काढून देईल. मात्र तुमचा मोठेपणा आहे ते तुम्ही मागणार नाहीत. फार मोठ्या प्रमाणात सरकार घाबरलेले आहे. निवडणुका कशा पुढे नेता येईल हे बघत आहे.
महाराष्ट्राची वाट लावण्याचं सरकारनं ठरवलंय
आज महाराष्ट्रातल्या आमच्या लाडक्या बहिणी सुरक्षित नाहीत. आठवड्यातून, दोन आठवड्यातून अतिशय घृणास्पद प्रकार समोर येतात. शाळेतील लहान बालिका देखील सुरक्षित नाहीत. या सरकारला राज्यातील कायदा व सुव्यवस्था टिकवता आली नाही. महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्था संपलेली आहे. पुणे शहरात नगरसेवकाचा खून झाला. तुम्ही ती क्लिप बघा, पंधरा सेकंदात माणसे येतात आणि गोळ्या घालून पळून जातात.महाराष्ट्रामध्ये चाललंय काय? नागपूर या गृहमंत्र्यांच्या जिल्ह्यात पोलीस स्टेशनमध्ये पोलीस जुगार खेळताना सापडले. या महाराष्ट्राची पूर्ण वाट लावण्याचे सरकारने ठरवले आहे.
'ती' अक्षम्य चूक जनता कधीही माफ करणार नाही
महाराष्ट्र, मराठवाड्यात प्रचंड पाऊस झालाय. सरकार इव्हेंट करण्यात गुंतलं आहे. शेतकरी पूर्णपणेउद्ध्वस्त झाला आहे. सरकारचे तिकडे लक्ष नाही. आज सगळ्यात दुर्दैवी सरकारच्या भ्रष्टाचाराचा एक नमुना बघायला मिळाला. मालवणला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा एका आपटे नावाच्या मुलाला करायला दिला. त्या आपटेने फूट दीड फुटाच्यावर पुतळा केला नव्हता. त्याला 28 फुटाचा पुतळा करायला दिला. तो पुतळा आठ महिन्यात कोसळला. ज्या बाजूला वारा येतोय त्याच बाजूला पुतळा कोसळला आणि म्हणे वाऱ्याने पुतळा कोसळला. या महाराष्ट्रात मराठी माणसं काहीही मान्य करतील. पण, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये झालेला भ्रष्टाचार आणि पुतळा उभा करण्यामध्ये झालेली अक्षम्य चूक कधीही माफ करणार नाही. याचं प्रायश्चित्त सरकारला द्यावं लागेल, अशी टीका जयंत पाटील यांनी केली.
महाराष्ट्राचा इतिहास बदलण्याचे पाप कोणाच्या तरी मनात
मला कधी कधी शंका येते की, या सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पुसायचं मनावर घेतलं आहे. काल-परवा राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली नाही. महाराज काय त्या ठिकाणी पर्यटनासाठी गेले होते का? मराठी राज्याला संपन्न करण्यासाठी सुरत छत्रपती शिवाजी महाराजांनी लुटली होती. शिवाजी महाराजांनी दोन वेळा सुरत लुटली होती. राज्याचे मुख्यमंत्री सांगतात सुरत लुटली नाही. गुजरात राज्याच्या विरोधात काहीही बोलायचं नाही, असे राज्यातील तीन त्रिकुटांनी ठरवलं आहे. आज इतिहास बदलण्याचं काम मोदी आणि शाह यांना खुश करण्याचे काम गृहमंत्री करतात. काल-परवा एक क्लिप बघितली तर देवेंद्र फडणवीस सांगतात अफजल खान हा औरंगजेबाचा सरदार होता. अफजल खान हा आदिलशाहाचा सरदार होता पण देवेंद्र फडणवीस म्हणतात अफजल खान हा औरंगजेबाचा सरदार होता. महाराष्ट्राचा इतिहास बदलण्याचे पाप कोणाच्या तरी मनात आहे, असे म्हणत त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केलाय.
विधानसभेला तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या पाठीमागे उभं राहा
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची हेळसांड करणाऱ्या सरकारला महाराष्ट्रात धडा शिकवायचं काम आपल्याला करायचे आहे. लोकसभेला ज्या पद्धतीने माढा विधानसभेमध्ये मताधिक्य दिले तसेच विधानसभेला तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या पाठीमागे भक्कमपणे उभं राहा, असे आवाहन देखील जयंत पाटील यावेळी केले.
आणखी वाचा