मोदींनी उल्लेख केलेल्या नेहासाठी सोलापुरात हिंदू जनआक्रोश मोर्चा; लोकसभेचे दोन्ही उमेदवार मोर्चात
कर्नाटकमधील नेहा हिरेमठ आणि मुंबईतल्या पूनम क्षीरसागर यांच्या हत्येच्या विरोधात आणि लव्ह जिहादला बळी पडू नये याच्या निषेधार्थ सोलापुरात हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला
सोलापूर: देशातील लोकसभा निवडणुकांमध्ये यंदाच्यावेळी कर्नाटक (Karnatak) राज्य चांगलेच चर्चेत आहे. कारण, गेल्या महिन्यात एकतर्फी प्रेमातून हत्या करण्यात आलेल्या नेहा हिरेमठ या मुलीच्या हत्येवरुन हिंदू संघटना आक्रमक झाल्या आहेत. तर, दुसरीकडे माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्जल रेवण्णा याने हजारो महिलांचे शोषण करुन फरार झाल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. रेवण्णा प्रकरणावरुन थेट भाजपच्या (BJP) वरिष्ठ नेत्यांना प्रश्न विचारले जात आहे. तर आता नेहा हिरेमठ हाही मुद्दा नेत्यांच्या सभांमध्ये दिसून येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही सोलापूरच्या (Solapur) सभेत नेहा हिरेमठचा उल्लेख करत काँग्रेसवर टीका केली होती. त्याच, नेहा हिरेमठ हिच्या हत्येच्या घटनेचा निषेध करत सोलापुरात हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला सोलापुरातील महायुती व महाविकास आघाडीचे दोन्ही उमेदवार उपस्थित होते.
कर्नाटकातील हुबळी-धारवाड येथील नेहा हिरेमठ या मुलीच्या हत्येच्या विरोधात सोलापुरात हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे. सोलापुरातील चार हुतात्मा चौक येथे हा मोर्चा पोहोचल्यानंतर व्यासपीठावरती आमदार राम सातपुते आणि आमदार प्रणिती शिंदे हे दोघेही आले होते. त्यानंतर, त्यांनी मोर्चातील लोकांसमवेत खाली बसून या हत्येच्या घटनेचा निषेध नोंदवला. सध्या निवडणुकांचा काळ असून नेहा हिरेमठच्या हत्येवरुनही चांगलच राजकारण होत असल्याचं दिसून येत आहे.
कर्नाटकमधील नेहा हिरेमठ आणि मुंबईतल्या पूनम क्षीरसागर यांच्या हत्येच्या विरोधात आणि लव्ह जिहादला बळी पडू नये याच्या निषेधार्थ सोलापुरात हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात आमदार राम सातपुते आणि आमदार प्रणिती शिंदे दोघेही सहभागी झाल्याचे दिसून आले. मोर्चा चार हुतात्मा चौकात पोहोचल्यानंतर सोलापूर लोकसभेचे दोन्ही उमेदवार सामान्य लोकांमध्ये बसून मोर्चात सहभागी झाले होते. या मोर्चाचे प्रमुख वक्ते नागणसूर मठाचे मठाधीपती श्रीकांठ शिवाचार्य स्वामी आणि मैंदर्गीच्या हिरेमठ मठाचे मठाधीपती श्रीकांठ शिवाचार्य महास्वामी हे होते, दोन्ही महाराजांनी आक्रमकपणे भूमिका मांडत या घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे.
कॉलेज आवारात हत्या
कर्नाटक राज्यात 18 एप्रिल अतिशय धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना घडली होती. एकतर्फी प्रेमातून काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीची कॉलेजच्या आवारात भर दिवसा हत्या करण्यात आली. प्रपोझ केल्यानंतर तरुणीने नकार दिल्याने रागावून 24 वर्षीय मुलाने विद्यार्थ्यीनीची हत्या केल्याने खळबळ उडाली होती. केएलई टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीमध्ये ही तरुणी एमसीएची (MCA) विद्यार्थिनी होती. या घटनेचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लिंगायत समाजाने एकत्र येऊन संताप व्यक्त केला होता.
हिंदू संघटना आक्रमक
नेहा ही हुबळी-धारवाड महानगरपालिकेचे काँग्रेस नगरसेवक निरंजन हिरेमठ यांची मुलगी होती, 18 एप्रिल रोजी ही धक्कादायक घटना घडली. या घटनेप्रकरणी पोलिसांनी आरोपी फयाजला अटक केली आहे. दरम्यान, फयाज हा तरुणीचा जुना वर्ग मित्र होता, फयाजला फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी राज्यातील अनेक ठिकाणी निदर्शने करण्यात आली आहेत.