(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Solapur Rain : अक्कलकोट तालुक्यात तुफान पाऊस, घरांमध्ये शिरलं पाणी, बोरगाव-वागदरी गावचा संपर्क तुटला
अक्कलकोट (Akkalkot) तालुक्यात बोर गावात तुफान पाऊस झाला आहे. त्यामुळं बोर गावातील अनेक लोकांच्या घरात मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं आहे.
Solapur Rain : सोलापूर (Solapur) जिल्ह्यात काही ठिकाणी चांगला पाऊस झाला आहे. काही ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळं नागरिकांच्या घरात देखील पाणी शिरल्याच्या घटना घडल्या आहेत. अक्कलकोट (Akkalkot) तालुक्यात बोर गावात तुफान पाऊस झाला आहे. त्यामुळं बोर गावातील अनेक लोकांच्या घरात मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं आहे. नाले, ओढे दुथडी भरुन वाहत असल्यानं बोरगाव-वागदरी या रस्त्याचा संपर्क देखील तुटला आहे. त्यामुळं वाहतुकीवर परिणाम झाला आहे.
अक्कलकोट तालुक्यात दमदार पावसानं हजेरी लावली. या मुसळधार पावसामुळं बोर गावच्या आसपासच्या अनेक ओढ्यांना पूर आला असून, जनजीवन विस्कळीत झालं आहे. अक्कलकोट तालुक्यातील बोरगाव, घोळसगाव, किणीवाडी, काझी कणबस बादोले यासह आदी गावात पावसानं थैमान घातलं आहे. शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. घोळसगाव येथील तलाव 100 टक्के भरला असून ओव्हरफ्लो झाला आहे. बोरगाव येथील पीर राजेबागसवार साठवण तलाव देखील 100 टक्के भरला असून बोरगावचा ओढा दुथडी भरुन वाहत आहे.
राज्यात विविध ठिकाणी पावसाची हजेरी
सध्या राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. मात्र, राज्यातील काही ठिकाणी पावसानं हजेरी लावली आहे. तसेच देशातील विविध भागात देखील दमदार पाऊस पडत असताना दिसत आहे. देशातील कर्नाटक, केरळसह राजधानी दिल्लीत पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. तर राज्यातील मुंबईसह ठाणे, पुणे, सातारा, धुळे, लातूर या परिसारत पाऊस झाला आहे. दरम्यान, येत्या तीन दिवसांत राज्याच्या विविध भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रासह घाट परिसरात, काही भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
राज्यात पावसाचा जोर कमी झाला असला तरी, काही ठिकाणी मुसळदार पावसामामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. विशेषत: मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पावासाचा खूप मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी शेती पिकं वाया गेली आहेत. तर काही ठिकाणी जमिनी खरवडून गेल्या आहेत. त्यामुळं बळीराजा संकटात सापडला आहे. राज्यात जवळपास आठ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावर पिकाचे नुकसान झाले आहे.
महत्त्वाच्या बातम्या: