Ashadhi Wari 2023 : पालखी सोहळ्यासाठी शासनाकडून बैठकांचे सत्र, मात्र मूलभूत सुविधा देण्यात सरकारची उदासीनता, पालखी मार्गाचे वास्तव
Ashadhi Wari 2023 : पालखी सोहळ्याची जवळपास सव्वा दोनशे वर्षांची परंपरा आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पालखीसोबत चालणाऱ्यांची संख्या कित्येक पटीने वाढत जाऊ लागल्याने अडचणी देखील वाढत चालल्या आहेत.
Ashadhi Wari 2023 : आषाढी एकादशी सोहळ्यासाठी जवळपास 10 ते 12 लाखांचा समाज संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम पालखी सोहळ्याच्या माध्यमातून पायी चालत पंढरपूरला येत असतो. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या पालखी मार्गाचे रुंदीकरण करत त्याचे रुपडे पालटले असले तरी गेल्या वर्षीपासून वारकरी संप्रदाय मागणी करीत असलेल्या सध्या सुविधा देखील शासन-प्रशासन देऊ शकले नसल्याचे वास्तव आहे. पालखी सोहळ्याची जवळपास सव्वा दोनशे वर्षांची परंपरा आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पालखीसोबत चालणाऱ्यांची संख्या कित्येक पटीने वाढत जाऊ लागल्याने अडचणी देखील वाढत चालल्या आहेत. यासाठीच केंद्र सरकारने अद्ययावत सहा पदरी पालखी मार्ग केल्याने गर्दीची अडचण संपली असली तरी हे मार्ग बनवताना शेकडो झाडांची कत्तल करणाऱ्या ठेकेदारांनी मार्गाशेजारी झाडेच न लावल्याने वारकऱ्यांना दिवसभरात निवाऱ्यासाठी उभारायला सावलीच राहिलेली नाही. याबाबत गेल्यावर्षी देखील वारकरी संप्रदायाने वृक्षारोपणाबाबत मागणी करुनही प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केलं. यामुळे यंदा उन्हात भाजत वारी करावी लागणार आहे.
पालखी मार्गावर दिशादर्शक फलक लावण्याची मागणी
पालखी मार्गाचे रुंदीकरण करताना ठिकठिकाणी आलेले उड्डाणपूल, बाह्यवळण रस्ते करण्यात आल्याने वारकऱ्यांना आपल्या न्याहारीचे, भोजनाचे, विसाव्याचे आणि मुक्कामाचे ठिकाण शोधावे लागत आहे. रास्ता रुंदीकरणात मोठ्या प्रमाणात कडेच्या जमिनी गेल्याने जुन्या पारंपरिक खुणा उरल्या नाहीत. यामुळे वारी सोहळ्यातील पारंपरिक महत्त्वाची ठिकाणे, रिंगण सोहळे आणि वारीतील इतर उपक्रम लक्षात येण्यासाठी पालखी मार्गावर दिशादर्शक फलक लावण्याची मागणी गेल्या वर्षीपासून सुरु आहे. मात्र याबाबत देखील बांधकाम विभागाचा उदासीनपणा वारकऱ्यांचा त्रास वाढवत आहे. पालखी मार्ग जर पालख्यांसाठी केला असेल तर या मार्गावर ठिकठिकाणी पालख्यांची दिशादर्शक नामफलक लावण्यात अडचण काय असा सवाल माऊली पालखी सोहळ्यातील ज्येष्ठ ज्ञानेश्वर महाराज जळगावकर यांनी विचारला आहे.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाचे चौपदरीकरण झाल्याने पालखी मार्गावरील सर्व जुन्या खुणा, माहिती फलक नष्ट झाले आहेत. वारकऱ्यांना गाव, पालखी तळ, विसावा, धावा, भारुड, रिंगण आदी जागा कळाव्यात यासाठी पालखी मार्गावर दिशादर्शक फलक लावावेत अशी मागणी गेल्या वर्षीपासून केली जात आहे. मात्र शासन आणि प्रशासनाला या मूलभूत प्रश्नाशी देणे-घेणे नसल्यासारखे दुर्लक्षित केले जात आहे.
पालखी सोहळे सोलापुरात येण्यापूर्वी प्रशासनाने कामं उरकण्याची अपेक्षा
आळंदी ते पंढरपूर या पालखी मार्गाचे काम जलदगतीने सुरु आहे. परंतु जेजुरी ते नीरा या रस्त्याचे अद्याप काम सुरु झाले नाही. इथे मोठ्याप्रमाणात गर्दी होते. सोलापूर जिल्ह्यात कामाचा वेग चांगला असला तरी प्रकल्पग्रस्त नागरिकांना नुकसान भरपाईची रक्कम न मिळाल्याने काही ठिकाणी अडचणी निर्माण झाल्या आहेत. सोलापूर जिल्हा स्वागत हे जिल्हा सीमेवरच झाले पाहिजे अशी मागणी असून सदाशिवनगर येथील रिंगण सोहळा, वेळापूर पालखी चौक आणि पालखी तळावरील अतिक्रमण यामुळे सोहळ्यात अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालखी सोहळे जिल्ह्यात येण्यापूर्वी प्रशासनाने कामे उरकावीत अशी वारकऱ्यांची अपेक्षा आहे.