Sindhudurg: तळकोकणात आढळला दुर्मिळ प्रजातीतील पोवळा साप; जाडी करंगळी एवढी अन् भला मोठा लांब
Sindhudurg: दुर्मिळ प्रजातीतील पोवळा साप सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळला आहे, हा साप विषारी जातीचा असल्याचं निष्पन्न झालं आहे.
Rare Snake Specie: सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यात अतिशय दुर्मिळ असलेला साप (Snake) आढळला आहे. तुळस गावात सापाची दुर्मिळ प्रजाती असलेला क्रॅस्टोस कोरल स्नेक, म्हणजेच पोवळा साप आढळला आहे. तुळस गावातील चूडजीवाडा येथील सद्गुरु सावंत यांना पोवळा साप आढळला. हा साप संपूर्ण पश्चिम घाटामध्ये प्रदेशनिष्ठ असून अतिशय दुर्मिळ आहे. हा साप पाहण्यासाठी सर्पमित्र जंगलात भटकंती करत असतात. हा साप विषारी प्रजातीमध्ये मोडला जाणारा आणि फारसा दृष्टीस न पडणारा आहे.
पोवळा जातीच्या सापाचा रंग ब्राऊन ब्लॅक असून पोटाखालून तो पूर्णपणे भगवा असतो. त्याचा भगवा रंग हा तो जहाल विषारी असल्याचं द्योतक मानलं जातं. सामान्यपणे दगडाखाली आणि पाला पाचोळ्याखाली हा साप राहतो. त्याचे भक्ष छोटे बेडूक, सरडे, पाली, गांडूळ इत्यादी कीटक आहेत. साधारणपणे दोन ते अडीच फुटापर्यंत या सापाची लांबी असते. या जातीचा पूर्ण वाढलेला साप हा करंगळी एवढा जाड असतो. त्याच्याबरोबर त्याच्या डोक्यावर भगवी जाड रेषा असते आणि हा साप घाबरला तर आपली शेपटी गोल करून ती जमिनीवर आपटून त्याच्याजवळ येऊ नका, असा इशारा देत असतो. सर्पमित्रांनी वेंगुर्ल्याच सापडलेल्या या सापाला सुरक्षितरित्या नैसर्गिक अधिवासात सोडून दिलं आहे.
कोल्हापुरातही आढळला दुर्मिळ जातीचा साप
कोल्हापूरच्या गगनबावडा परिसरात ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरात 3 ऑगस्टला दुर्मिळ प्रजातीचा तस्कर साप (Trinket) आढळून आला. गगनबावडा येथील ग्रामीण रुग्णालयात बालरोगतज्ज्ञ म्हणून वैद्यकीय अधिकारी पदावर काम करणाऱ्या डॉ. अमित पाटील यांना हा दुर्मिळ साप आढळून आला. चार ते साडेचार फूट लांबीचा आणि एक ते सव्वा इंच जाडीचा पूर्ण वाढ झालेला हा साप त्यांनी पकडला. मात्र, नेहमी आढळणाऱ्या सामान्य तस्कर (Common Trinket) सापापेक्षा या सापाचा रंग जास्त गडद आणि डोक्यावरील पट्टे वेगळे असल्याचं त्यांच्या लगेच लक्षात आलं. उत्सुकता ताणल्याने त्यांनी इंटरनेवरून माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यातून फारसं काही हाती लागलं नाही.
त्यामुळे पाटील यांनी राधानगरीच्या सम्राट केरकर यांच्या माध्यमातून सर्पतज्ज्ञ डॉ. वरद गिरी आणि कर्नाटकातील प्रसिद्ध प्राणिशास्त्रज्ज्ञ डॉ. दीपक देशपांडे यांच्याशी फोनच्या माध्यमातून संपर्क साधला. डॉ. देशपांडे यांनी त्यांना काही संदर्भ पाठवून पुढील अभ्यास केला. डॉ. गिरी यांनी डॉ. अमित पाटील यांनी पाठवलेल्या विविध फोटोंच्या आधारे निदान करून हा ‘सामान्य तस्कर’ साप नसून ‘मॉण्टेनचा तस्कर’ साप (Montane's Trinket) असल्याचं आणि हा अतिशय दुर्मिळ, सहजासहजी न आढळणारा साप असल्याचं सांगितलं.
हेही वाचा: