(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Chetan Patil: स्ट्रक्टरल कन्सल्टंट चेतन पाटीलला मध्यरात्री कोल्हापुरातून उचललं, थेट मालवणात नेलं, चौकशीतून पुतळ्याबाबत कोणती नवी माहिती समोर येणार?
Who is Chetan Patil: चेतन पाटील हा शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला तेव्हा स्ट्रक्टरल कन्सल्टंट होता. त्याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कोल्हापुरातील एका शैक्षणिक संस्थेमध्ये 2010 पासून तो प्राध्यापक आहे.
सिंधुदुर्ग: राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला बांधकाम सल्लागार (स्ट्रक्चरल कन्सल्टंट) चेतन पाटील याला पोलिसांनी गुरुवारी मध्यरात्री कोल्हापूरमधून ताब्यात घेतले. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने ताब्यात घेतल्यानंतर त्याला मालवण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते. त्यानंतर चेतन पाटील (Chetan Patil) याला पुढील चौकशीसाठी मालवणात नेण्यात आले. पोलिसांचे पथक त्याला घेऊन तातडीने मालवणच्या दिशेने रवाना झाले होते. चेतन पाटीलला मालवण पोलीस स्थानकात आणण्यात आले असून दुपारी साडेतीन वाजता मालवण दिवाणी न्यायालयात दाखल केले जाणार आहे. या सुनावणीत काय घडणार, हे पाहावे लागेल.
न्यायालयाने पोलीस कोठडी दिल्यानंतर चेतन पाटील याची चौकशी करण्यात येईल. या चौकशीतून राजकोट किल्ल्यावरील (Rajkot Fort) छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबाबत नेमकी कोणती माहिती समोर येणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. चेतन पाटील हा राजकोट किल्ला पुतळा प्रकरणातील बांधकाम सल्लागार होता. कोल्हापुरातील (Kolhapur News) एका शैक्षणिक संस्थेमध्ये 2010 पासून तो प्राध्यापक म्हणून देखील काम करत होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याच्या शोधासाठी कोल्हापूर गगनबावडा सह परिसरामध्ये पोलिसांची पथके त्याचा शोध घेत होती. कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने गुरुवारी रात्री त्याला कोल्हापुरातील एका नातेवाईकाच्या घरातून ताब्यात घेतले होते.
मी न्यायालयात योग्य ते पुरावे सादर करेन: चेतन पाटील
चेतन पाटील याने दोन दिवसांपूर्वीच 'एबीपी माझा'शी संवाद साधला होता. त्यावेळी चेतन पाटील याने त्याच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले होते. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उभारणीशी माझा कोणताही संबंध नाही. मी नौदलाला केवळ शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी उभारण्यात आलेल्या चबुतऱ्याचे डिझाईन तयार करुन दिले होते. या चबुतऱ्यावर 11 टन वजन असेल, असे मला सांगण्यात आले होते. त्यानुसार मी नौदलाला चबुतऱ्याचे डिझाईन तयार करुन दिले. यापलीकडे मी पुतळ्याचे कोणतेही काम केलेले नाही. पुतळ्याचे काम ठाण्यातील एका कंपनीला देण्यात आले होते. ज्यावेळी पुरावे सादर करायची वेळ येईल, तेव्हा मी ते पुरावे न्यायालयासमोर सादर करेन, असे चेतन पाटील यांनी सांगितले होते.
आणखी वाचा