Jaydeep Apte: छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना प्रकरण : जयदीप आपटेला 10 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी
Jaydeep Apte: छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी काल अटक करण्यात आलेल्या मुख्य आरोपी जयदीप आपटेला पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
सिंधुदुर्ग: सिंधुदुर्गातील मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी काल अटक करण्यात आलेल्या मुख्य आरोपी जयदीप आपटोला पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बनवणारा शिल्पकार जयदीप आपटेला येत्या 10 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दुर्घटना झाल्यानंतर राज्यातील नागरिकांना संताप व्यक्त केला होता. या घटनेनंतर या पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटे हा फरार झाला होता. घटनेनंतर तब्बल 11 दिवसांनी फरार जयदीप आपटेला काल पोलिसांनी पकडलं आहे. यानंतर जयदीप आपटेला आज मालवण न्यायालयात हजर करण्यात आलं. अखेर मालवण न्यायालयाने जयदीप आपटेला 10 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
सिंधुदुर्गात शिल्पकार जयदीप आपटेनी बनवलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा 26 ऑगस्ट रोजी कोसळला. त्यानंतर शिल्पकार जयदीप आपटे हा फरार झाला. पोलिसांनी जयदीप आपटेच्या विरुद्ध लूकआऊट नोटीस देखील जारी केली होती. काल बुधवारी जयदीप आपटे कल्याणमध्ये पोलिसांच्या तावडीत सापडला. आज जयदीप आपटेला कल्याण पोलिसांनी मालवण पोलिसांच्या ताब्यात दिले. यानंतर जयदीप आपटेला मालवणमध्ये आणण्यात आले. त्याला मालवण न्यायालयासमोर हजर करण्यात आले.
आज या प्रकरणाची सुनावणी दिवाणी न्यायाधीश महेश देवकते यांच्यासमोर पार पडली. यावेळी सरकारी वकील तुषार भनगे यांनी बाजू मांडली. तर आरोपीचे वकील गणेश सोहनी यांनीही त्यांची बाजू मांडली. या दोन्हीही बाजू ऐकल्यानंतर न्यायाधीशांनी जयदीप आपटेला 10 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. जयदीप आपटे हा पोलीस कोठडीत राहणार आहे. त्याचबरोबर या प्रकरणातील दुसरा आरोपी आणि बांधकाम सल्लागार चेतन पाटील याची पोलीस कोठडी आज संपली आहे. त्यालाही आज न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. चेतन पाटीललाही 10 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पळून पळून कुठे जाणार होता? मुख्यमंत्र्याचा इशारा
मी परवाच सांगितलं होतं, आपटे पळून पळून कुठे जाणार आहे. त्याची चौकशी होईल कठोर कारवाई होईल. या प्रकरणातील दोषीला मग तो कोणीही असो त्याला सरकार सोडणार नाही. जे लोकं अफवा पसरवत होते त्यांना चपराक मिळाली आहे. छत्रपती आराध्य दैवत आहे, झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. दुर्घटना झाली त्या ठिकाणी पुन्हा एकदा शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारला जाणार आहे, या घटनेचं राजकारण करणं देखील दुर्दैवी आहे, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
कसा जाळ्यात सापडला जयदीप आपटे
पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांच्या नेतृत्त्वाखालील पोलिसांच्या पथकाने बुधवारी संध्याकाळी जयदीप आपटेला (Jaydeep Apte) कल्याणमधील राहत्या घरातून ताब्यात घेतले. यापूर्वी मालवण पोलिसांचे पथक जयदीप आपटे याच्या घरी आले होते तेव्हा घराला कुलूप होते. परंतु, बुधवारी जयदीप आपटे अचानक आपल्या राहत्या घरी अवतरला आणि अलगद पोलिसांच्या हाती लागला. जयदीप आपटे याला ताब्यात घेतल्यानंतर तातडीने सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा 26 ऑगस्टला कोसळला होता. तेव्हापासून जयदीप आपटे हा फरार होता. अनेक दिवसांच्या शोध मोहिमेनंतरही पोलिसांना त्याचा पत्ता लागला नव्हता. त्यामुळे विरोधकांनी राज्य सरकार आणि गृहमंत्रालयावर टीकेची झोड उठवली होती. पोलिसांनी जयदीप आपटे याच्याविरोधात लूकआऊट नोटीस जारी केली होती. त्याला शोधण्यासाठी पोलिसांची पाच पथकं विविध ठिकाणी शोध घेत होती. जयदीप आपटे (Jaydeep Apte) इतके दिवस हाती लागत नसल्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेबद्दल अनेकांनी प्रश्न उपस्थित केले होते. परंतु, बुधवारी संध्याकाळी जयदीप आपटे अलगदपणे पोलिसांच्या तावडीत सापडला.