Satara News: साताऱ्यात बाजार समितीच्या भूमीपूजनावरून राडा, उदयनराजे आणि शिवेंद्रराजे आमनेसामने
खासदार उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत त्यांच्या कार्यकर्त्यांनी उधळून लावलं. मात्र तरी देखील उदयनराजेंचा विरोध झुगारून शिवेंद्रराजे भोसले यांनी भूमीपूजन केलं.
सातारा : साताऱ्यात (Satara News) शिवराज ढाब्याजवळ असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नूतन जागेच भूमिपूजनाच्या कार्यक्रमामुळे खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले आमने सामने आले आहेत. खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांच्या उपस्थितीत त्यांच्या कार्यकर्त्यांनी उधळून लावलं. मात्र तरी देखील उदयनराजेंचा विरोध झुगारून शिवेंद्रराजे भोसले (Shivendraraje Bhosale) यांनी भूमीपूजन केलं. या प्रकारानंतर उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांचे कार्यकर्ते आमनेसामने आले. यामुळे साताऱ्यात दोन्ही राजेंमधला वाद पुन्हा उफाळून आला आहेत.
आज सकाळी दहा वाजता आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते या जागेचं भूमिपूजन होणार होतं. मात्र नऊ वाजता उदयनराजे आपल्या कार्यकर्त्यांसह पोहोचले, आणि तिथं असलेलं साहित्य फेकून दिलं. तसंच, एक कंटेनरही जेसीबीनं नष्ट केला. त्यानंतर शिवेंद्रराजेंनी कार्यकर्त्यांसह येत उदयनराजेंचा विरोध झुगारून त्यांच्या समोर भूमीपूजन केलं.
परिस्थिती नियंत्रणात
माझ्या जागेत भूमिपूजन करायचं नाही असे म्हणत उदयनराजेंनी शिवेंद्रराजेंच्या कार्यकर्त्यांना झापलं. वाद सुरू असतानाच आमजार शिवेंद्रराजेंनी उदयनराजेंसमोर भूमिपूजन केले. त्यानंतर काही वेळासाठी तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र पोलिसांनी मध्यस्ती करत परिस्थिती नियंत्रणात आणली.
भूमीपूजन झालेच नाही : उदयनराजे
जागा माझ्या मालकीची आहे. भूमीपूजन झालेच नाही. नारळ आणि फटाके फोडणे म्हणजे भूमीपूजन नााही. काळेधंदे करणारे लोक आहेत. मी द्वेषापोटी बोलत नाही, असे उदयनराजे म्हणाले.
आज सत्याचा विजय झाला : शिवेंद्रराजे
शेतकरी आणि व्यापाऱ्यासाठी हे मार्केट यार्ड उभे करत आहे. यामध्ये आमचा कोणताही वैयक्तिक स्वार्थ नाही. ज्यांचा या भूमीपूजनला विरोध आहे त्यांनी कोर्टाकडून स्टे ऑर्डर आणून आपली बाजू मांडावी. आज सत्याचा विजय झाला आहे. भूमीपूजनाचा कार्यक्रम पार पडला आहे. जे कामाला विरोध करत आहे, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी शिवेंद्रराजेंनी केली आहे.
उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे यांच्यातील वाद
उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे यांच्यातील वाद आजचा नाही. अनेक वेळा खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यात मनोमिलन झाले. मात्र कोणत्या तरी किरकोळ कारणांवरून दोन्ही राजे आमने सामने आल्याच्या घटना अनेकवेळा घडल्या आहेत. दोघांमधील वाद विकोपाला जाताना दिसतो आहे. एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी दोघेही सोडत नाहीत. मात्र या दोघांच्या वादाला आणि इथल्या राजघरण्याच्या राजकारणाला मोठा इतिहास आहे. आज झालेल्या प्रकारानंतर दुर्दैवाने हे दोन्ही राजे खरेच शिवाजी महाराजांचे वंशज आहेत का??? असा प्रश्न जनतेला नक्कीच पडतो