Satara Crime : लग्नाचं आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून लग्नास नकार, मायलेकीची आत्महत्या; 'त्या' घटनेचा उलघडा
अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून इच्छेविरुद्ध संबंध प्रस्थापित करून लग्नास नकार दिल्याने नैराश्यात संबंधित अल्पवयीन पीडित मुलगी आणि तिच्या आईने विहिरीत आत्महत्या केल्याचे समोर आलं आहे.
फलटण (जि.सातारा) : सातारा जिल्ह्यातील (Satara News) फलटण तालुक्यातील एका गावात दोन दिवसांपूर्वी मायेलकीचा मृतदेह विहिरीत सापडल्याने एकच खळबळ उडाली होती. कौटुंबिक परिस्थिती पाहता घातपात की आत्महत्या? याबाबत तर्कवितर्क लढवले जात होते. आता या प्रकरणात दाखल झालेल्या तक्रारीमुळे प्रकरणाचा उलघडा झाला आहे. अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून इच्छेविरुद्ध संबंध प्रस्थापित करून लग्नास नकार दिल्याने नैराश्यात संबंधित अल्पवयीन पीडित मुलगी आणि तिच्या आईने विहिरीत आत्महत्या केल्याचे समोर आलं आहे.
या प्रकरणी मामाकडून फिर्याद दाखल करण्यात आली आहे. फिर्याद दाखल झाल्यानंतर संबंधित संशयित फरार झाले आहेत. संबंधित अल्पवयीन मुलीच्या मामाने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. दिलेल्या तक्रारीनुसार सुखदेव मिंड, त्याची पत्नी राधा आणि त्याचा मुलगा गणेश (सर्व रा. पवारवाडी ता. फलटण) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
तिघेही संशयित आरोपी फरार
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संबंधित मुलीच्या मामाने फिर्याद देताना म्हटले आहे की, सुखदेव आणि त्याची पत्नी राधाला माझी भाची अल्पवयीन आहे हे माहीत असतानासुद्धा मुलगा गणेशला लग्नाचे आमिष दाखवून प्रेमसंबंध ठेवण्यास सांगितले. 21 सप्टेंबर रोजी भाचीला फूस लावून फलटणला नेत तिच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने शारीरिक संबंध निर्माण केले. त्यानंतर लग्न करण्यास नकार दिला. यानंतर संबंधित पीडित मुलीने सर्व हकिकत माझ्या बहिणीस सांगितली. यानंतर दोघींनी 22 सप्टेंबर रोजी सकाळी पवारवाडी गावच्या हद्दीत असलेल्या गावात विहिरीत उड्या मारून आत्महत्या केली. दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर तिघेही संशयित आरोपी फरार झाले आहेत. पोलिसांनी त्यांच्या शोधासाठी विशेष पथके तयार केली आहेत.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी गावच्या हद्दीत घरापासून अर्धा किमी अंतरावर विहिरीत पहिल्यांदा अल्पवयीन मुलीच्या आईचा मृतदेह आढळून आला होता. यानंतर विहिरीतून पाणी बाजूला करून शोध घेण्यात आल्यानंतर त्या मुलीचाही मृतदेह सापडला. दरम्यान, संबंधित महिलेच्या पतीचे यापूर्वीच निधन झाले आहे. त्यामुळे घातपात की आत्महत्या याबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत होती.
इतर महत्वाच्या बातम्या