(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सांगली : ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी बाबू नदाफ यांचे निधन, भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील रणझुंजार हरपला
Sangli News : भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील तासगाव तालुक्यातील मणेराजुरी येथील ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी बाबू हसन नदाफ (वय 103 वर्षे) यांचे आज उपचारादरम्यान निधन झाले.
Sangli News : भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील तासगाव तालुक्यातील मणेराजुरी येथील ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी बाबू हसन नदाफ (वय 103 वर्षे) यांचे आज उपचारादरम्यान निधन झाले. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी, क्रांती अग्रणी जी. डी. बापू लाड, कॅप्टन रामचंद्र लाड, माजी मुख्यमंत्री कै. वसंतदादा पाटील, बर्डे गुरुजी यांच्या सोबत सांगली जिल्ह्यात क्रांतिकारकांची फौज उभी राहिली. त्या तुफान सेनेतील एक क्रांतिकारक म्हणजे बाबू हसन नदाफ.
1988 मध्ये तत्कालिन राजीव गांधी पंतप्रधान असताना " ताम्रपट" देऊन त्यांचा दिल्लीत सत्कार करण्यात आला होता. महाराष्ट्र शासनानेही त्यांचा सन्मान केला आहे. चालू वर्षात सोलापूर हुतात्मा एक्स्प्रेस या नवीन रेल्वे गाडीला हिरवा झेंडा दाखवून उद्घाटनही बाबू नदाफ यांच्याहस्ते करण्यात आले होते. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त 15 ऑगस्ट 2022 रोजी शासनाच्या वतीने त्यांचा तासगाव येथे सन्मानही करण्यात आला होता.
इंग्रजांच्या विरोधात सशस्त्र चळवळीत मोठा सहभाग
तासगाव तालुक्यातील मणेराजुरी गावातील एका सामान्य मुस्लिम कुटुंबातील जन्मालेल्या बाबू नदाफ हे गांधीजी आणि क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या विचाराने भारावून स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झाले होते. भूमिगत होऊन तारा तोडणे, पोस्ट जाळणे, रेल्वे रूळ उखडणे, रेल्वे लुटणे अशा धाडसीपणाने इंग्रजांच्या विरोधात सशस्त्र चळवळीत मोठा सहभाग घेतला होता.
त्यामुळे इंग्रजांनी त्यांच्यावर अटक वॉरंट काढले होते. ते सापडत नाहीत म्हटल्यावर पकडून किंवा पत्ता सांगणाऱ्यास बक्षीसही ठेवले. पुढे शेनोळी येथे रेल्वे लुट होत असताना गोळीबार झाला. त्यावेळी पोलिसांना चकवा देऊन पळताना बाबू नदाफ आणि त्यांचे सहकारी बापू शेवाळे हे दोघे जखमी झाले. बाबू नदाफ यांना पायाला गोळी लागली. त्यामुळे जखमी असताना पोलिसांनी त्यांना अटक केली. कोल्हापूरला जेलमध्ये नेत असताना वॉन्टेड क्रांतिकारक जिवंत पकडला म्हणून बक्षिसांची रक्कम पोलिसांनी त्यांच्या अंगावर उधळून आनंद साजरा केला होता.
आझाद हिंद सेनेमध्येही सहभाग
बाबू नदाफ यांना पुणे येथील येरवडा तुरुंगात 3 वर्षाची शिक्षा झाली होती. ती शिक्षा भोगून बाहेर आले आणि पुन्हा चळवळीत सक्रिय झाले होते. 1942 च्या लढ्याअगोदर दुसऱ्या महायुद्धाच्या काळात आझाद हिंद सेनेमध्येही त्यांनी कॅप्टन शाहनवाज खान यांची भेट घेतली व सहभाग घेतला होता. परंतु बाहेर देशात त्यांना जाता आले नाही. पुढे 1942 च्या स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी सहभाग घेतला होता.