सांगलीच्या जागेमुळे वाद चालू असतानाच राऊतांनी घेतली भाजपच्या नेत्याची भेट; नेमकं काय घडतंय?
सांगली जागेचा तिढा अद्याप सुटलेला नाही. या जागेवरून मविआत वाद चालू असताना संजय राऊत यांनी भाजपच्या माजी आमदाराची भेट घेतली आहे.
सांगली : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) महाविकास आघडीमध्ये (Maha Vikas Aghadi) जागावाटप जवळजवळ पूर्ण झाले आहे. पण सांगली या एका जागेमुळे मविआतील (MVA) घटकपक्षांत चांगलाच तणाव निर्माण झाला आहे. या जागेबाबतचा तिढा सोडवण्यासाठी आतापर्यंत कित्येक बैठका पार पडल्या. मात्र अजूनही कोणताही पक्ष माघार घ्यायला तयार नाही. आम्हाला विश्वासात न घेताच उद्धव ठाकरे यांनी चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) यांना उमेदवारी दिली, असा अशी भूमिका काँग्रेसने (Congress) घेतली आहे. दरम्यान, एकीकडे हा वाद चालू असताना दुसरीकडे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेतील नेते तथा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी अचानकपणे भाजपच्या माजी आमदारी भेट घेतली आहे.
राऊतांनी घेतली विलासराव जगताप यांची भेट
भाजपचे सांगलीचे उमेदवार संजयकाका पाटील यांच्या उमेदवारीला विरोध करणाऱ्या भाजपपचे माजी आमदार विलासराव जगताप यांची संजय राऊत यांनी भेट घेतली आहे. त्यासाठी राऊत थेट जतमध्ये गेले होते. विलासराव जगताप हे भाजपचे माजी आमदार आहेत. त्यांनी संजयकाका पाटील यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. विशेष म्हणजे संजयकाका पाटील यांच्या उमेदवारीला विलासराव जगताप यांनी थेट विरोधही केला आहे. असे असतानाच संजय राऊत यांनी विलासराव यांची भेट घेतली आहे.
काँग्रेसच्या भूमिकेमुळे ठाकरे गटाची अडचण
या दोन्ही नेत्यांच्या बैठकी कोणत्या विषयावर चर्चा झाली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या चंद्रहार पाटलांच्या उमेदवारीला महाविकास आघाडीतीलच राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि काँग्रेस यांच्याकडून विरोध होत आहे. चंद्रहार पाटलांची उमेदवारी जाहीर करताना आम्हाला विश्वासात घेण्यात आलेलं नाही, अशी भूमिका काँग्रेसने घेतली आहे. खासदार शरद पवार यांनीदेखील काँग्रेसप्रमाणेच मत व्यक्त केले आहे. काहीही झाले तरी आम्ही ही जागा सोडणार नाही,असंही काँग्रेसचं म्हणणं आहे. सहकारी पक्षांच्या या भूमिकेमुळे शिवसेनेची चांगलीच पंचाईत झाली आहे. असे असतानाच आता संजय राऊत यांनी भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप यांची भेट घेतली आहे. या भेटीचा नेमक उद्देश काय होता? सांगली जिल्ह्याचा तिढा सोडवण्यासाठी ही भेट झाली का? असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत.
सांगलीचा वाद थेट दिल्ली दरबारी
दरम्यान, काँग्रेस सांगलीच्या जागेवर अडून आहे. ही जागा काँग्रेसला न मिळाल्यास आम्ही चंद्रहार पाटलांचा प्रचार करणार नाही, अशी भूमिका सांगलीच्या काँग्रेसच्या नेत्यांनी घेतली आहे. संजय राऊत चंद्रहार पाटलांच्या प्रचाराला सांगलीत गेले होते. मात्र राऊतांच्या या दौऱ्याकडे काँग्रेसच्या नेत्यांनी पाठ फिरवली होती. दुसरीकडे काँग्रेसचे नेते विश्वजित कदम, विशाल पाटील यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेण्यासाठी दिल्ली गाठली होती. म्हणजेच सांगली जागेचा तिढे थेट दिल्ली दरबारी गेला आहे. त्यामुळे आता या जागेवर नेमकं काय घडणार? ही जागा काँग्रेसला मिळणार का? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.