(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sangli Loksabha Election Result : सांगलीत अपक्ष विशाल पाटलांची 'करेक्ट कार्यक्रमा'कडे वाटचाल; लोकसभेला 'विश्वजित'साठी मोठी आघाडी!
सांगलीच्या जागेवरून ठाकरे गट आणि काँग्रेस आमने-सामने आले होते. ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्यापासून त्यांच्या उमेदवारीला काँग्रेसकडून शेवटपर्यंत विरोध करण्यात आला.
Sangli Loksabha Election Result : राज्यात सर्वाधिक लक्ष लागून राहिलेल्या सांगली लोकसभा मतदारसंघांमध्ये विशाल पाटील यांनी निर्णायक आघाडी घेतली आहे. सांगली लोकसभेवरून महाविकास आघाडीमध्ये मिठाचा खडा पडतो की काय अशी स्थिती निर्माण झाली होती. सांगलीच्या जागेवरून ठाकरे गट आणि काँग्रेस आमने-सामने आले होते. या ठिकाणी ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्यापासून त्यांच्या उमेदवारीला काँग्रेस नेत्यांकडून शेवटपर्यंत विरोध करण्यात आला.
विशाल पाटील यांच्या उमेदवारीने काँग्रेस आणि ठाकरे गटामध्ये संघर्ष
त्यामुळे विशाल पाटील यांच्या उमेदवारीने काँग्रेस आणि ठाकरे गटामध्ये संघर्ष सुरू होता. मात्र, आलेल्या निकालानंतर विशाल पाटील यांनी जवळपास बाजी मारल्याचे चित्र आहे. विशाल पाटील यांनी निर्णय आघाडी घेत विजयाकडे वाटचाल सुरु केली आहे. विशाल पाटील यांच्या बंडखोरीने महाविकास आघाडीमध्ये वादळ निर्माण केले होते. या जागेवरून ठाकरे गटाकडून परस्पर उमेदवार घोषित करण्यात आल्याचा आरोप सातत्याने काँग्रेसकडून करण्यात आला होता. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही ठाकरे यांनी सांगलीची जागा परस्पर घोषित करण्यात आली, असे म्हटले होते. त्यामुळे सांगलीच्या जागेवरून आघाडीमध्ये मतभेद निर्माण झाले होते.
विशाल पाटील यांनी करेक्ट कार्यक्रम केल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगली
इतकेच नव्हे तर विशाल पाटील आणि आमदार विश्वजीत कदम यांच्यावरही सातत्याने ठाकरे गटांकडून आरोप करण्यात आले होते. यामध्ये संजय राऊत आघाडीवर होते.मात्र आता निकालामध्ये विशाल पाटील यांनी जवळपास खासदारकी खेचून आणल्यात जमा आहे. त्यामुळे सांगलीमध्ये विशाल पाटील यांनी करेक्ट कार्यक्रम केल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगली आहे. सातत्याने विशाल पाटील यांच्या उमेदवारीला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा विरोध असल्याचे बोलले जात होतं. त्याचबरोबर अंतर्गत विरोधामुळेही विशाल पाटील हा मतदारसंघ सुटू शकला नाही, अशीही चर्चा रंगली होती. मात्र, विशाल पाटील यांनी कोणत्याही परिस्थितीत सांगली लोकसभा लढवण्याचा निर्णय कायम ठेवला होता.
शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांना वंचित बहुजन आघाडीकडूनही पाठिंबा जाहीर करण्यात आला. प्रकाश आंबेडकर यांनी त्यांच्यासाठी सभा घेतली होती. विजय दिसू लागल्यानंतर विशाल पाटील समर्थकांनी सांगलीमध्ये जल्लोष करण्यास सुरुवात केली आहे. विशाल पाटील यांच्यासाठी भाजपच्या दोन माजी आमदारांनी पक्षाला रामराम करत विशाल पाटील यांचा उघडपणे प्रचार केला होता. आजी माजी नगरसेवक सुद्धा विशाल पाटील यांच्या प्रचारात उतरले होते. त्यामुळे संजय पाटील विद्यमान खासदार विजयाची हॅट्ट्रिक करणार की नाहीत? याकडे लक्ष होते. मात्र, आता आपण विशाल पाटील यांनी घेतलेली आघाडी पाहता संजय पाटील यांचा कार्य कार्यक्रमाच झाल्याचे चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या