Sangli Crime: सांगलीमधील (Sangli News) मिरजमध्ये गांजा विक्री करणाऱ्या एका रिक्षाचालकाला महात्मा गांधी चौक पोलिसांनी अटक केली आहे. या रिक्षाचालकाकडून तीन लाखांचा गांजा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईने मिरजमधून गांजा तस्करीचे मोठे रॅकेट चालवलं जातं असल्याचे समोर आलं आहे.
मिरज स्टँड परिसरात सापळा रचून कारवाई
मिरजमधील एसटी स्टँड परिसरात रिक्षामधून गांजा विक्री करण्यासाठी जात असल्याची गोपनीय माहिती महात्मा गांधी पोलीस ठाण्याला मिळाली होती. त्यानुसार मिरज एसटी स्टँड परिसरात पोलीस पथक तयार करुन सापळा रचण्यात आला. ऑटो रिक्षा एसटी स्टँडजवळ आली असता पथकाने रिक्षा अडवून रिक्षा चालक वैभव राजू कनशेट्टी (वय 30 रा. मिरज) याला ताब्यात घेतले. यावेळी रिक्षाची झडती घेतली असता एका प्लास्टिक पिशवीत एक लाख 70 हजार रुपये किमतीचा 6 किलो 800 ग्राम वजनाचा गांजा अढळून आला.
या गुन्ह्यात वापरलेली सुमारे दीड लाख रुपये किंमतीची रिक्षा असा 3 लाख 20 हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. अंमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार वैभव राजू कनशेट्टीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिल्डा, पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक राजू अन्नछत्रे आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी केली आहे. याबाबत अधिक तपास महात्मा गांधी पोलीस करत आहेत.
अत्याचार करुन गळा कापला; गांजाच्या नशेत 20 वर्षीय तरुणाचे कृत्य
दरम्यान, याच महिन्याच्या सुरुवातीला सांगलीमध्ये एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करत मिरजेत नेऊन अत्याचार केल्याची घटना घडली होती. त्यानंतर तिचा गळा चिरुन जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. यात मुलगी गंभीर जखमी झाली होती. गांजाच्या नशेत 20 वर्षीय तरुणाने हे कृत्य केलं होतं. प्रसाद मोतुगडे माळी (वय 20 वर्षे, राहणार ब्राह्मणपुरी मिरज) असं आरोपी तरुणाचं नाव आहे. आरोपीने पीडित मुलीचं रिक्षातून अपहरण केलं. त्यानंतर तिला मिरजमध्ये भाड्याने घेतलेल्या खोलीत तिला घेऊन गेला. तिथे तिच्यावर अत्याचार करुन तिलाच्या गळ्यावर कटरने वार करुन तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याबाबत मिरज शहर पोलिसात आरोपी प्रसाद मोतुगडे माळीविरोधात अपहरण, पॉक्सो, ॲट्रॉसिटी आणि अत्याचार तसेच खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या