सांगली: वाढत्या प्रदूषणामुळे पर्यावरणाचा गुदमरत चाललेला प्राण वाचवण्याचे काम बांबू लागवड चळवळीतून केला जात आहे. कोरोना टाळेबंदीच्या काळात सांगलीत (Sangli Bamboo Plantation) सुरु झालेली ही चळवळ आतापर्यंत राज्यातील सहा जिल्ह्यात पसरली आहे. यामधून पंचवीस हजारावर बांबूची लागवड झाली असून त्यातून रोज 50 टन ऑक्सिजन वातावरणात सोडला जातो. तर त्याच्या दुप्पट म्हणजे 116 टन कार्बनडाय ऑक्साईड शोषून घेतला जातो. सांगली कोल्हापूर, सातारा, सोलापूर, अहमदनगर, बीड या जिल्ह्यात बांबू लागवड वाढली आहे. 

सांगलीतील बांबू तज्ज्ञ डॉ. दीपक येरटे यांनी या बांबू लागवड चळवळीचा प्रारंभ कोरोना टाळेबंदीच्या काळात सुरु केला. बांबू झाडांची लागवड आता दहा हजारांवर पोहचली आहे. यातून रोज वीस टन प्राणवायूची म्हणजेच ऑक्सिजनची वातावरणात भर टाकली जात आहे. तर 50 टन कार्बन डायऑक्साईड शोषून घेतला जातो. खडकाळ, क्षारपड, पूरग्रस्त भागातील जमीन, कमी पाण्याची जमिनीत बांबूची लागवड करता येते. शिवाय बांबूला चांगला दर मिळत असल्याने याच्या लागवडीने दुहेरी फायदा मिळतो.

शेतकऱ्यांची अनुत्पादक जमीन लागवडीखाली येते. त्यातून 40 वर्षांपर्यंत उत्पन्न मिळते आणि पर्यावरणातील प्राणवायूचे प्रमाण वाढून प्रदूषण कमी होते. जिल्ह्यात क्षारपड जमिनीचे प्रमाण मोठे आहे. तेथे बांबूची लागवड व्हावी यासाठी डॉ. येरटे यांचे प्रयत्न सुरु आहेत. याबरोबरच त्यांनी सोलापूर, कोल्हापूर, अहमदनगर, बीड या जिल्ह्यांमध्येही ही चळवळ वाढवण्याचा प्रयत्न चालवला आहे. त्याला शेतकऱ्यांचा हळूहळू प्रतिसाद मिळू लागला आहे.

राज्य शासनाच्या रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत बांबू लागवडीसाठी अनुदान मिळते. स्वतः संशोधन करुन विकसित केलेल्या बांबू लागवड प्रकल्पातून पश्‍चिम महाराष्ट्रात प्रदुषणमुक्त पर्यावरण करण्याचे उद्दिष्ट डॉ. येरटे यांनी ठेवले आहे. जिल्ह्यात पाचशे शेतकऱ्यांचा गट झाला तर त्यांना केंद्र सरकारच्या कार्बन क्रेडीट योजनेचा लाभ मिळू शकतो. त्यासाठी शेतकऱ्यांनी पुढे येणे गरजेचे आहे.

आज या बांबू लागवडीमुळे एकीकडे 50 टन ऑक्सिजन वातावरणात सोडला जातो. तर त्याच्या दुप्पट म्हणजे 116 टन कार्बनडाय ऑक्साईड शोषून घेतला जातो. दुसरीकडे या बांबू मुळे पक्ष्यांनाही त्यांचा अधिवास मिळाला आहे. विविध प्रकारच्या पक्ष्यांनी बांबूच्या बनामध्ये घरटी तयार केली आहेत. मधमाशांनी पोळे तयार केले आहेत.

    बांबू लागवड ऑक्सिजन उत्सर्जन  कार्बनडाय ऑक्साईड शोषण
सांगली 10017  20 टन   50 टन
कोल्हापूर  1750  3.5 टन  10 टन
सातारा 550 1.2 टन 3 टन
सोलापूर  8100 16 टन 38 टन
अहमदनगर 2500  5 टन 7.5 टन
बीड  2550 5.1 टन 7.7 टन
       
एकूण 25467 50.8 टन 116.2 टन