Sangli Crime: सांगलीतील (Sangli News) जत तालुक्यातील करजगी येथील वादग्रस्त तलाठी लाचखोर असूनही जत तालुका तलाठी संघटनेचा अध्यक्ष म्हणून थाटात मिरवणारा बाळासाहेब शंकर जगतापला 50 हजारांची लाच घेताना सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्याला घरातच रंगेहाथ पकडले. घरी धार्मिक कार्यक्रम असल्याने त्याने तक्रारदाराला घरीच लाचेची रक्कम घेऊन येण्यास सांगितले होते. घरात सुवासिनींचा धार्मिक कार्यक्रम सुरु असतानाच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बाळासाहेबला सापळा रचत पकडले. लाचखोर जगतापने आपल्या तिल्याळ गावी शेततळे बांधलं आहे. या तळ्याचे पूजन आणि सुवासिनींसाठी प्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी पाहुणे मंडळी सुद्धा आली होती. त्यांच्यासमोरच जगताप लाचलुचपतने रंगेहाथ पकडून उचलल्याने एकच चर्चा रंगली.
तलाठी बाळासाहेब जगताप हा करजगीत तलाठी आहे. तक्रारदाराचे घर बांधकाम सुरु असून बांधकामासाठी आलेल्या वाळूचा बेकायदा साठा केला आहे असे सांगून तसेच बेकायदा वाळू साठवणूक केली म्हणून कारवाई न करण्यासाठी तलाठी जगतापने तक्रारदारकडे 50 हजारांची लाच मागितली. तक्रारदाराने सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीनंतर पडताळणी करण्यात आली. बांधकामासाठी आणलेली वाळू होती, असे असतानाही बेकायदा वाळू साठा केला असे सांगून कारवाई न करण्यासाठी तलाठी जगतापने 50 हजार लाचेची मागणी केली असल्याचे निष्पन्न झाले.
घरीच लावला सापळा आणि जाळ्यात अडकला
लाचलुचपत पथकाने मंगळवारी तलाठी जगतापच्या गुड्डापूर रोडवरील आसंगी येथे राहत्या घरी सापळा लावला. तक्रारदाराकडून राहत्या घरी 50 हजारांची लाच स्वीकारताना जगतापला रंगेहाथ पकडले. याप्रकरणी उमदी पोलीस ठाण्यात लाचखोर तलाठी बाळासाहेब जगतापविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लाचखोर जगताप दुसऱ्यादा अडकला जाळ्यात
लाचखोर जगताप हा दुसऱ्यांदा लाचलुचपतच्या जाळ्यात अडकला आहे. 7 जुलै 2014 रोजी तक्रारदाराच्या खरेदी दस्ताची नोंद घेऊन सातबारा उतारा देण्यासाठी 10 हजार लाचेची रक्कम घेताना रंगेहाथ पकडण्यात आले होते. त्यावेळी मिरज शहर पोलीस गुन्हा दाखल करण्यात आला होता. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.
संबंधित कारवाई पोलीस उपायुक्त अमोल तांबे, अप्पर उपायुक्त विजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक संदीप पाटील, पोलीस निरीक्षक दत्तात्रय पुजारी, पोलीस अंमलदार, विनायक मिलारे, प्रित्तम चौगुले, ऋषीकेश बडणीकर, अजित पाटील, सलिम मकानदार, सुदर्शन पाटील, रविंद्र धुमाळ, पोपट पाटील, सीमा माने, उमेश जाधव, रामहरी वाघमोडे, चालक वंटमुरे यांनी केली.
इतर महत्वाच्या बातम्या