Sangli Crime : सांगलीतील (Sangli) एका अल्पवयीन मुलीचे अपहरण (Abduction) करुन तिला मिरजेत नेऊन तिच्यावर अत्याचार (Sexual Assault) केला. त्यानंतर तिचा गळा चिरुन जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. यात मुलगी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. गांजाच्या नशेत 20 वर्षीय तरुणाने हे कृत्य केलं. या प्रकरणी मिरजेतील (Miraj) तरुणाविरोधात मिरज शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपी अद्याप फरार असून त्याचा शोध सुरु आहे.


गांजाच्या नशेत आरोपीचं कृत्य


प्रसाद मोतुगडे माळी (वय 20 वर्षे, राहणार ब्राह्मणपुरी मिरज) असं आरोपी तरुणाचं नाव आहे. आरोपीने पीडित मुलीचं रिक्षातून अपहरण केलं. त्यानंतर तिला मिरजमध्ये भाड्याने घेतलेल्या खोलीत तिला घेऊन गेला. तिथे तिच्यावर अत्याचार करुन तिलाच्या गळ्यावर कटरने वार करुन तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. आरोपीने गांजाच्या नशेत हे कृत्य केल्याचं समजतं. 


मुलीवर उपचार सुरु


दरम्यान आरोपीने केलेल्या हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी झाली आहे. तिच्या उजव्या हाताची नस कापल्याचं देखील कळतं. तिच्या नातेवाईकांनी तिला उपचारासाठी भारती रुग्णालयात दाखल केलं. सध्या तिच्यावर उपचार सुरु आहेत.


आरोपी फरार, शोध सुरु


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याबाबत मिरज शहर पोलिसात आरोपी प्रसाद मोतुगडे माळी याच्याविरोधात अपहरण, पॉक्सो, ॲट्रॉसिटी आणि अत्याचार तसेच खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. याबाबतचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिलडा हे करत आहेत


सांगलीत एकाच दिवशी खुनाच्या तीन घटना


दरम्यान काही दिवसांपूर्वी सांगली जिल्ह्यात एकाच दिवशी खुनाच्या (Murder) तीन घटना घडल्या होत्या. यामध्ये मिरज तालुक्यात दोन तर कवठेमहांकाळ (Kavathe Mahankal) तालुक्यात एकाचा खून झाला. एकाच दिवशी आणि लगतच्या तालुक्यात तीन खुनाच्या घटना घडल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. मिरज तालुक्यातील एरंडोली गावी पत्नीने पतीचा चाकूने भोसकून खून केला होता तर बेडग गावी मुलाने वडिलांना ट्रॅक्टरखाली चिरडून जीवे मारल्याचा प्रकार घडला होता. तर कवठेमहांकाळ तालुक्यातील बिरोबा बनाच्या हॉटेलमध्ये वेटरनेच किरकोळ कारणातून दुसऱ्या वेटरच्या डोक्यात लाकडी फाळकूट घातले ज्यात तो जखमी झाला आणि उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला होता. 


Sangli Crime : गांजाच्या नशेत अल्पवयीन मुलीचा गळा चिरुन आरोपी फरार