(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sangli Crime : तासगावमधील द्राक्ष व्यापाऱ्याच्या 1 कोटी 10 लाखांच्या लुटीचा अवघ्या 8 तासात छडा; सांगली एलसीबीकडून तीन आरोपी शिताफीने जेरबंद
Sangli Police : सांगली एलसीबीने अवघ्या आठ तासांमध्ये तिघांना जेरबंद करत एक कोटी नऊ लाख रुपयांची रोकड हस्तगत केली. द्राक्ष दलाल मुळचे नाशिकचे असून सध्या तासगावमधील गणेश कॉलनीत राहण्यास होते.
Sangli Police : सांगली जिल्ह्यामधील (Sangli News) तासगावमध्ये महेश शितलदास केवलानी या द्राक्ष व्यापाऱ्याच्या स्कार्पिओ गाडीच्या आडवी गाडी लावून द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना देण्यासाठी आणलेल्या पैसे लुटीचा अवघ्या काही तासात छडा लावण्यात सांगली पोलिसांच्या एलसीबी पथकाला यश आले आहे. तासगावमधील दत्तमाळ गणेश कॉलनीत ही घटना घडली होती. नितीन यलमार (वय 22), विकास पाटील (वय 32) आणि अजित पाटील (वय 22) अशी तिघा संशयितांची नावे आहेत. तिन्ही आरोपी तासगाव तालुक्यातील मतकुणकीमधील आहेत. सांगली एलसीबीने अवघ्या आठ तासांमध्ये तिघांना जेरबंद करत एक कोटी नऊ लाख रुपयांची रोकड हस्तगत केली. द्राक्ष दलाल मुळचा नाशिकचा असून सध्या तासगावमधील गणेश कॉलनीत राहण्यास होते. ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी तत्काळ सर्वत्र नाकाबंदी करत आरोपींच्या शोधासाठी पथके तैनात केली होती.
प्रसंग नेमका काय घडला?
याबाबत माहिती अशी की, द्राक्ष व्यापारी महेश शितलदास केवलाणी (वय 49 रा. पिंपळगाव, ता. निफाड जि. नाशिक) हे द्राक्ष खरेदीचे शेतकर्यांना पैसे देण्यासाठी जात असताना तासगावमधील दत्तमाळ येथे असलेल्या गणेश कॉलनीमध्ये मोटार अडवून लुटण्याचा प्रकार मंगळवारी (29 मार्च) सायंकाळी साडेसात वाजता घडला होता. व्यापारी केवलाणी हे स्कॉर्पिओ (एमएच-15-0215) मधून दिवाणजी राजेंद्र माळी व चालक आकाश चव्हाण यांच्यासोबत एक कोटी 10 लाखांची रोकड घेऊन सांगलीहून तासगावमध्ये तात्पुरते निवास असलेल्या गणेश कॉलनीमध्ये निघाले होते. यावेळी वीजपुरवठा बंद असल्याने अंधाराचा फायदा घेत दुचाकीवरून आलेल्या दोघांनी चालकाच्या बाजूकडील काचेवर हात मारून काच खाली करण्यास भाग पाडले. काच खाली केल्यानंतर तलवारीने धाक दाखवत मागील बाजूस बसलेल्या व्यापार्यांच्या हातातील रोकड असलेली पिशवी घेउन पोबारा करण्याचा प्रयत्न केला. यावेळी व्यापारी व दिवाणजीने अटकाव केला असता त्यांना मारहाण करून पसार झाले होते.
पोलिसांकडून पथके तत्काळ रवाना
या प्रकरणी तासगाव पोलिस ठाण्यात तत्काळ माहिती देण्यात आल्यानंतर पोलिसांची पथके रवाना करण्यात आली. स्थानिक शाखेचे कर्मचारी सागर टिंगरे यांना संशयित लुटलेल्या रोकडसह मणेराजुरीच्या शिकोबा डोंगराच्या पायथ्याला असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे निरीक्षक सतीश शिंदे व भानुदास निंभोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक संदीप शिंदे, प्रशांत निशाणदार, संदीप गुरव, सागर लवटे, मच्छिंद्र बर्डे, अनिल कोळेकर, संदीप पाटील, प्रशांत माळी, अमोल ऐदळे, प्रकाश पाटील आदी कर्मचार्यांना छापा टाकून तिघांना ताब्यात घेतले. गुन्ह्यात वापरण्यात आलेली दुचाकीही वाळवा तालुक्यातील मच्छिंद्रड येथून चोरलेली असल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांनी व्यापाऱ्याकडून चोरलेली रोख रक्कम 1 कोटी 09 लाख रुपये, गुन्हा करण्यासाठी वापरण्यात आलेली 30 हजार किंमतीची स्प्लेंडर मोटार सायकल, गुन्ह्यात वापरलेली तलवार असा एकुण एक कोटी नऊ लाख तीस हजार दोनशे किंमतीचा मुद्देमाल सपोनि संदीप शिंदे यांनी पंचासमक्ष सविस्तर पंचनामा करुन ताब्यात घेतला.
इतर महत्वाच्या बातम्या