Sangli Crime : मिरजेत थेट बँकेचा कर्मचारीच खातेदारांच्या पैशावर डल्ला मारुन फरार!
Sangli Crime : सांगली जिल्ह्यातील मिरज (Miraj News) शहरात एका खासगी बँक कर्मचाऱ्याने खातेदारांना कोट्यवधींचा गंडा घातला आहे. संशयित तोहिद शरीकमसलत सध्या फरार आहे.
Sangli Crime : सांगली जिल्ह्यातील मिरज (Miraj News) शहरात एका खासगी बँक कर्मचाऱ्याने खातेदारांना कोट्यवधींचा गंडा घातला आहे. याप्रकरणी फसवणूक झालेल्या खातेदारांनी आणि बँक व्यवस्थापनाने तोहिद शरीकमसलत (रा.मिरज) या बँक कर्मचाऱ्याविरुद्ध मिरज शहर पोलिसात तक्रार दिली आहे. संशयित तोहिद शरीकमसलत सध्या फरार आहे. संशयित शरीकमसलत हा मिरजेतील अॅक्सिस बँकेचा कर्मचारी आहे. त्याने त्याच्या ओळखीच्या खातेदारांना म्युच्युअल फंड व बँकेच्या विविध योजनात पैसे गुंतवण्यास भाग पाडले होते. त्यानंतर त्याने खातेदारांशी ओळख वाढवून त्यांच्या बँक खात्यातील रक्कम मोबाईल बँकिंगद्वारे इतरांच्या खात्यात वळून परस्पर काढून घेतली होती. त्याने काही ओळखीच्या खातेदारांना बँकेने खातेदारांसाठी खास योजना आणली आहे, फंडामध्ये गुंतवणूक करतो असे देखील सांगितले होते.
तसेच सध्या माझे प्रमोशन आहे, माझ्या प्रमोशनला मदत करण्यासाठी काही महिन्यासाठी बँकेत ठेवी ठेवा, अशी गळही त्याने काही खातेदारांना घालून रक्कम घेतली होती. खात्याशी संलग्न असलेला मोबाईल क्रमांक परस्पर बदलून त्यांच्या खात्यातील रक्कम इतरांच्या खात्यात वर्ग करून ती काढून घेतल्याचे निदर्शनास आले आहे. त्याने सर्फराज बेग, इबाज शरीकमसलत, जहांगीर रोपळे आणि जिब्रान सय्यद या चार जणांच्या खात्यावर खातेदारांची रक्कम वळवून ती परस्पर काढून घेतल्याचे निष्पन्न झाले आहे. गेल्या सहा महिन्यापासून हा उद्योग सुरू होता.
तोहिदने आतापर्यंत 20 जणांना गंडा घातल्याचा अंदाज आहे. त्याने अमिना नजीर अहमद शेख 6 लाख, गणी गोधड 12 लाख, हुसेन बेपारी 23 लाख , शिराज कोतवाल 23 लाख , वाहिद शरीकमसलत 11 लाख, रमेश सेवानी 16 लाख आणि मेहबूब मुलाणी व अनिल पाटील यांना प्रत्येकी 2 लाख रुपयांना गंडा घातल्याची तक्रार आहे. खातेदारांनी याबाबत बँकेकडे तक्रार केल्यानंतर अॅक्सिस बँकेचे व्यवस्थापक साजिद पटेल यांनी तोहिदविरुद्ध मिरज शहर पोलिसात तक्रार दिली आहे.
तोहिदवर बँकेतून बडतर्फीची कारवाई करण्यात येणार असल्याचे पटेल यांनी सांगितले. फसवणुकीबाबत चौकशी सुरू असून सर्व फसवणूकदारांच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
इतर महत्वाच्या बातम्या