Rahul Gandhi on PM Modi : ..तर माफी मागण्याची वेळ येत नाही, मग मोदींनी महाराष्ट्रात कोणत्या कारणांसाठी माफी मागितली? राहुल गांधींचा हल्लाबोल
पतंगराव कदम यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण राहुल गांधी यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर झालेल्या सभेमध्ये बोलताना राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींसह भाजपवर घणाघाती हल्ला चढवला.
Rahul Gandhi on PM Modi : कोणी चुकीचं कृत्य केलं आहे, तोच माफी मागत असतो. ज्यानं चुकीचं कृत्य केलेलं नाही तो माफी मागत नाही. मग मोदींनी महाराष्ट्रामध्ये कोणत्या कारणांसाठी मागितली? अशी विचारणा काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली. आज सांगलीमध्ये पतंगराव कदम यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण राहुल गांधी यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर झालेल्या विराट सभेमध्ये बोलताना राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींसह भाजपवर घणाघाती हल्ला चढवला. छत्रपती शिवरायांची मूर्ती कोसळल्यानंतर राज्यात संतप्त वातावरण आहे. हाच मुद्दा पकडत राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला.
महाराष्ट्रातील प्रत्येक जनतेची माफी मागितली पाहिजे
राहुल गांधी म्हणाले की, मोदी यांनी कोणत्या कारणासाठी माफी मागितली? त्यामागे तीन कारणे असू शकतात. ते पुढे म्हणाले की, मूर्तीचं काम आरएसएसच्या माणसाला दिलं गेलं होतं ते द्यायला नको होतं. ते काम मेरिटवर द्यायला हवे होतं. दुसरं कारण एक असू शकतं ते म्हणजे मूर्तीच्या कामामध्ये भ्रष्टाचार झाला असेल किंवा चोरी झाली असेल त्यासाठी कदाचित मोदी यांनी माफी मागितली असावी. तिसरं कारण म्हणजे शिवाजी महाराजांची मूर्ती केली पण ती मूर्ती उभी राहू शकली नाही. मात्र या ठिकाणी पतंगराव कदम यांची जी मूर्ती उभी केली गेली आहे ती तुम्ही 50-60 वर्षांनी जरी पाहिली तर ते तुम्हाला दिसेल. मात्र, शिवरायांच्या पुतळ्यामध्ये कंत्राटदाराने चुकीच्या पद्धतीने काम केल्यानेच मूर्ती कोसळल्याने मोदी यांनी माफी मागितली असावी, अशी तीन कारणे देत राहुल गांधी यांनी मोदींच्या माफीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले की शिवाजी महाराजांचा यांनी अपमान यांनी केला असून महाराष्ट्रातील प्रत्येक जनतेची माफी यांनी मागितली पाहिजे, अशी राहुल गांधी यांनी मागणी केली.
हे सरकार केवळ दोन लोकांसाठी चालवत असल्याचा घणाघात सुद्धा केला राहुल गांधी यांनी केला. नोटबंदी चुकीच्या पद्धतीने झाली. जीएसटीची ज्या पद्धतीने अंमलबजावणी झाली त्याची सुद्धा माफी मागावी अशी मागणी राहुल गांधी यांनी केली. तत्पूर्वी, बोलताना पतंगराव कदम यांच्या आठवणी जागवताना राहुल गांधी म्हणाले की, त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य महाराष्ट्र, देशासाठी दिले. शेवटपर्यंत पक्षाशी एकनिष्ठ राहिले. इंदिरा गांधी निवडणुकीमध्ये पराभूत झाल्यानंतर सोबत राहिले होते. मध्यरात्री सभा घेतली होती. महाराष्ट्र विकसित राज्य असून राज्याच्या विकासामध्ये अनेकांचे योगदान आहे. या राज्याला शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहू महाराज, डॉ. आंबेडकर यांनी प्रेरणा दिली असल्याचे म्हणाले.
आमची विचारधारा आणि शिवाजी महाराजांची विचारधारा एकच
ते पुढे म्हणाले की आमची विचारधारा आणि शिवाजी महाराजांची विचारधारा एकच आहे. आमच्या डीएनएमध्येच विचारधारा असल्याचे राहुल गांधी म्हणाले. विचारधारेविरुद्ध युद्ध असून एका बाजूला महापुरुष आहेत आणि दुसऱ्या बाजूला भाजप असल्याचे राहुल गांधी म्हणाले. निवडक लोकांना फायदा देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे टीका सुद्धा राहुल गांधी यांनी केली. मागास लोकांना मागास ठेवण्याचाच प्रयत्न सुरू असल्याचेही ते म्हणाले. भाजपकडून धर्मा-धर्मांमध्ये, जाती जातींमध्ये, भाषा भाषांमध्ये लढवलं जात आहे, असेही ते म्हणाले. भाजपकडून सर्वच ठिकाणी आपल्या विचारधारेची माणसं बसवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप सुद्धा राहुल गांधी यांनी केला.
इतर महत्वाच्या बातम्या