Sangli Crime : कोल्हापूर जिल्ह्यात बनावट नोटांचा प्रकार आल्यानंतर आता सांगली जिल्ह्यातही खोट्या नोटा देऊन खऱ्या नोटा घेण्याचा धक्कादायक प्रकार मिरजमध्ये घडला. या प्रकरणात तिघांना अटक करण्यात आली आहे. मुलांच्या खेळण्यातील बनावट नोटा देऊन खऱ्या नोटा घेण्याचा डाव अटक केलेल्या आरोपींचा होता. तिघा आरोपींना साडे तीन लाखांच्या मुद्देमालासह अटक करण्यात आली आहे. 


आरोपींना महात्मा गांधी चौकी पोलिसांनी अटक केली आहे. 60 हजार रोख आणि मनोरंजन नोटासह साडेतीन लाखांचा मुद्देमाल या तिघांच्या टोळीकडून जप्त करण्यात आला. यामध्ये भारतीय बच्चो का बँक असे लिहिलेले 500 रुपयांचे 55 बंडल आणि 2 हजार व 100 रुपयांच्या 45 मनोरंजन नोटांच्या बंडलांचा समावेश आहे.


समोर आलेल्या माहितीनुसार मिरजेतील कृष्णा रोडवर काही इसम बनावट नोटा बॅगमध्ये भरून दुसर्‍याला देण्याच्या तयारीत असताना गांधी चौकी पोलिसांनी छापा टाकून दोघांना अटक केली.  त्यांच्याकडून ३ लाख ५६ हजार १७० रूपये जप्त केले आहेत. या प्रकरणी उमर खुदबुद्दीन एकसंबेकर, नदीब सज्जान नालबंद, शब्बीर साहेबहुसेन पिरजादे या तिघांना अटक केली.  यामध्ये आणखी काहीजण अटक होण्याची शक्यता आहे. 


मिरजेतील कृष्णाघाट येथे महात्मा गांधी चौक पोलिसांच्या नाकेबंदी दरम्यान एका गाडी तपासण्यात आली. ज्यामध्ये नोटांनी भरलेली बॅग आढळून आली. 2 हजार, 500 आणि 100 रुपयांच्या नोटांचे बंडल असल्याचे समोर आले. यानंतर नोटांची तपासणी करण्यात आली असता, प्रत्येक नोटांवर आणि खाली खऱ्या नोटा आणि आतील बाजूस लहान मुलांच्या खेळण्यासाठी असणाऱ्या "भारतीय बच्चे बँक"च्या हुबेहूब खऱ्या नोटांप्रमाणे दिसणाऱ्या नोटा होत्या. ज्यामध्ये 500 रुपयांच्या 55 बंडल आणि 2 हजार व 100 रुपयांच्या 45 मनोरंजन नोटांच्या बंडलांचा समावेश होता.


इतर महत्त्वाच्या बातम्या