सांगली : येथील मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी शिवराज्याभिषेक दिनानिमित मोडी लिपी आणि उर्दू भाषेत शिवचरित्र लिहून ते भित्तीपत्रकांच्या माध्यमातून मांडले आहे. अशा पध्दतीने मोडी आणि उर्दू भाषेत भित्तीपत्रिका करणारे गरवारे महाविद्यालय राज्यातील पहिले महाविद्यालय आहे.


प्रत्येक महाविद्यालयात दरवर्षी कोणत्या ना कोणत्या विषयांची भित्तीपत्रिका केली जाते. गरवारे महाविद्यालयात मात्र, इतिहास विभागाच्या वतीने मोडी लिपीतील भित्तीपत्रिका करण्याचा अभिनव उपक्रम येतो. दरवर्षी महाविद्यालयात शिवजयंतीच्या निमित्ताने महाराजांचा जीवनपट मोडी लिपीतील भित्तीपत्रिकेच्या माध्यमातून उलगडून दाखविण्यात येतो. 


प्राचार्य डॉ. आर. जी. कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली इतिहास विभागाच्या प्रा. डॉ. उर्मिला क्षीरसागर, मोडी शिक्षक मानसिंगराव कुमठेकर हे या उपक्रमाचे संयोजन करतात. मोडी वर्गाच्या विद्यार्थिनी | शिवजयंतीनिमित्त 'शिवस्मरण' हे अभिनव भित्तीपत्रक करतात.


यंदा राज्याभिषेक दिनानिमित्त मोडी आणि उर्दू लिपीतून भित्तीपत्रक करण्याचा संकल्प विद्यार्थिनींनी केला. विद्यार्थिनींनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विविध पैलूंची माहिती सांगणारे ३० हून अधिक लेख मोडी लिपी आणि उर्दूमधून लिहिले आहेत. शिवाजी महाराजांचे शेती विषयक धोरण, आरमार, विविध किल्ले, त्यांचे भाषाविषयक धोरण, अशा विविध विषयावर मोडी आणि उर्दू मध्ये लेख लिहून ते आकर्षकरित्या मांडण्यात आले आहेत. 


प्राचार्य डॉ.आर.जी. कुलकर्णी, प्रा.डॉ. उर्मिला क्षीरसागर, मोडी शिक्षक कुमठेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ३० हून अधिक विद्यार्थिनींनी मोडी लिपीतील लेख लिहिले आहेत. या अभिनव भित्तीपत्रिकेचे उद्घाटन प्राचार्य डॉ.आर.जी. कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉ.नंदिनी काळे, डॉ. उर्मिला क्षीरसागर उपस्थित होते. याप्रसंगी मोडी लिपीतील अक्षरांची रांगोळीही रेखाटण्यात आली होती. यावेळी वेदश्री जोशी आणि जान्हवी तानवडे यांनी कवि भूषणाचे छंद सादर करून कार्यक्रमात बहार आणली. विविध लिपी आणि भाषांच्या माध्यमातून केले जाणारे हे  'शिवस्मरण" शिवरायांना अनोखी मानवंदना देणारे ठरले.