Sangli Raj Thackeray News : मनसे अध्यक्ष राज ठाकरे वारंट हुकूम होऊन देखील हजर न राहिल्यामुळं न्यायालयाने बुधवारी पुन्हा अजामीन पत्र वारंट आदेश जारी केला आहे. पुढील तारीख 11 जुलै 2022 दिली आहे. मनसे नेते शिरीष पारकर यांनी न्यायालयात हजर राहून जामीन अर्ज दिल्याने त्यांचा अजामीनपात्र वारंट आदेश रद्द केला गेला आहे. मात्र राज ठाकरे हे वारंट हुकूम होऊन देखील न्यायालयात हजर राहिले नाहीत. म्हणून न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध पुन्हा अजामीनपात्र वॉरंटचा आदेश दिला आहे.
शिराळा येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांचे कोर्टात नियमित फौजदारी खटला सुनावणी झाली. यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आरोपी क्रमांक 9 शिरीष पारकर हे आरोपी क्रमांक दहा म्हणून समाविष्ट आहेत. यापूर्वी या दोघांनाही न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंटचा आदेश केला होता. त्याप्रमाणे शिरीष पारकर यांनी बुधवारी न्यायालयात हजर राहून जामीन दिला. यावेळी न्यायालयाने त्यांच्या विरुद्ध केलेला अजामीनपात्र वॉरंटचा आदेश रद्द केला.न्यायालयाने पारकर यांना 15 हजार रुपयांच्या जामिनावर आणि 700 रुपए खर्चाची दंडाची रक्कम भरून जामीन मंजूर केला.
राज ठाकरे हे वारंट हुकूम होऊनदेखील न्यायालयात हजर राहिले नाहीत. यामुळे न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध पुन्हा अजामीनपात्र वॉरंटचा आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पी. ए. श्रीराम यांनी दिला आहे. दरम्यान ठाकरे यांच्या वकिलांनी इंस्लामपूर येथील जिल्हा सत्र न्यायालयात रीट दाखल केले आहे.
सुनावणीला वारंवार गैरहजरी
शिराळा न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यात वारंवार गैरहजर राहिल्याबद्दल न्यायदंडाधिकाऱ्यांनी 28 एप्रिल रोजी अजामीनपात्र वॉरंट बजावलं होतं. त्यामुळे तिघांनाही 8 जून रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते.राज ठाकरे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत आणि शिरीष पारकर यांच्यासह दहाजणांवर बेकायदेशीर जनसमुदाय गोळा करणे, शांततेचा भंग करणे, चुकीच्या मार्गाने हुसकावणे, घोषणाबाजी करणे अशा विविध कलमाखाली तसेच 28 जानेवारी, 25 जानेवारी, 11 फेब्रुवारी आणि 28 एप्रिल 2022 या तारखांना गैरहजर राहिल्याबद्दल यांच्यावर शिराळा न्यायालयात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे नेमकं प्रकरण
सन 2006 मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना झाल्यानंतर सन 2008 मध्ये भारतीय रेल्वे मध्ये मराठी तरुणांना नोकरीची संधी मिळावी म्हणून मनसेतर्फे महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात आलं होतं. याबद्दल रेल्वेच्या कल्याण न्यायालयात राज ठाकरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. म्हणून त्यांना रत्नागिरी येथे अटक करून कल्याण न्यायालयात नेण्यात आलं होतं. त्यामुळे महाराष्ट्रभर मनसेने आंदोलन करून अनेक ठिकाणी बंद पुकारला होता. यावेळी शिराळा मनसेकडून तानाजी सावंत यांनी शेडगेवाडी येथे बंद पुकारून व्यापाऱ्यांना दुकाने बंद करण्यास भाग पाडले म्हणून तानाजी सावंत आणि इतर काही जणांवर गुन्हे दाखल झाले होते. राज ठाकरे यांना 8 जून 2022 रोजी शिराळा न्यायालयात हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. परंतु राज ठाकरे आणि जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत काही कारणास्तव न्यायालयात हजर राहिले नाहीत. मात्र शिरीष पारकर न्यायालयात उपस्थित राहिले.